![Shivsena UBT](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/01/Shivsena-UBT-696x447.jpg)
राज्यभरातील सरकारी आणि निमसरकारी विद्यापीठातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी एटीकेटीची संधी दिली जावी, यासाठी युवासेनेने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राज्यभरातील सरकारी आणि निमसरकारी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी एटीकेटीची संधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्याबाबतचा जीआर आज सरकारने काढला. त्यामुळे राज्यभरातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
शिवसेना-युवासेना सचिव आमदार वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली गेल्या महिन्यात युवासेना सिनेट सदस्यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री पाटील यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी मुंबई विद्यापीठाच्या कालिना पॅम्पस येथे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी एटीकेटी मिळावी, यासाठी पालकांसह आंदोलन केले होते. ते विद्यार्थीही यावेळी उपस्थित होते. या विषयावर चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन या विद्यार्थ्यांना फक्त एक वर्षासाठी एटीकेटीची संधी देण्याची मागणी तत्त्वतः मान्य केली होती. यावेळी राज्यभरातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठीही एका वर्षासाठी एटीकेटीची संधी देण्यात येईल, असे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. त्यानुसार आज जीआर काढण्यात आला.