विघ्न टळले! अखेर सरकारचे लोटांगण, चार दिवस गोडाऊनमध्ये ठेवलेल्या बाप्पांचे आज विसर्जन!

माघी गणेशात्सवात बाप्पाच्या विसर्जनावर आलेले ‘विघ्न’ अखेर सरकारच्या लोटांगणामुळे टळले असून गेल्या चार दिवसांपासून गोडाऊनमध्ये ठेवलेल्या बाप्पांचे आज 11 व्या दिवशी विसर्जन केले जाणार आहे. मात्र प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या कोणत्याही मूर्तीचे विसर्जन समुद्रात होणार नसून पालिकेने निर्माण केलेल्या कृत्रिम तलावातच केले जाणार आहे. यासाठी कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे कारण देत मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांनी माघी गणेशोत्सवातील ‘पीओपी’च्या मोठय़ा मूर्तींचे समुद्रामध्ये विसर्जन करण्यास बंदी घातली होती. अचानक घातलेल्या या बंदीमुळे विसर्जन मिरवणूक काढूनही गणेशभक्तांना आपली गणेशमूर्ती परत आणून गोडाऊनमध्ये ठेवावी लागल्याची नामुष्की आली होती. विशेषतः पश्चिम उपनगरात मार्वे समुद्रावर विसर्जनासाठी नेलेल्या मूर्तींना माघारी पाठवण्यात आले होते. त्यामुळे पोलीस आणि पालिकेमध्ये प्रचंड संघर्ष निर्माण झाला होता. विशेष म्हणजे पाच दिवासांच्या बाप्पांचे विसर्जन समुद्रात करण्यात परवानगी दिली असताना अचानक सात दिवसांच्या बाप्पाची अडवणूक केल्याने पोलीस आणि प्रशासनाविरोधात गणेशभक्तांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात होता. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून गणपती विसर्जनासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अशा आहेत मूर्तिकारांच्या समस्या

  •  शाडूची माती मुंबईत सहज उपलब्ध होत नाही
  •  शाडूच्या मोठय़ा मूर्तींचे वजन वाढल्याने तडे जातात
  •  शाडूच्या मूर्ती ठिसूळ झाल्याने कोसळण्याचा धोका असतो
  •  मूर्ती शाडूची असली तरी नदी, नाले, समुद्र प्रदूषण
  •  मूर्ती कौशल्याच्या व्यवसायावर गदा येणार
  •  सरकारची मूर्तिकार, मंडळांसोबत कोणतीही चर्चा नाही
  • कागदासारख्या वस्तूंपासून बनवलेल्या मूर्ती कोसळण्याचा धोका

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे पर्यावरण संवर्धनासाठी ‘पीओपी’च्या मूर्ती समुद्रात विसर्जित करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मात्र या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी सातही परिमंडळांचे उपायुक्त आणि 24 वॉर्डच्या सहायक आयुक्तांच्या समन्वयाने सर्व मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत. –  प्रशांत सकपाळे, उपायुक्त

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पीओपीच्या मूर्तींचे उत्पादन, विक्री आणि विसर्जनावर बंदी आहे. त्यामुळे नॅशनल पार्कमध्ये 15 फुटांपर्यंतच्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. बांगूरनगरलाही अशी व्यवस्था आहे. शिवाय आणखी पर्यायी जागा शोधले जात आहेत. – भाग्यश्री कापसे,उपायुक्त

 सरकारने ‘पीओपी’ला पर्याय द्यावा

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्याची आमची तयार आहे. मात्र सरकारने ‘पीओपीला’ पर्याय दिला पाहिजे. बाप्पाचे आगमन झाल्यानंतर अचानक मूर्ती कशी बदलणार, असा सवाल मंडळांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

असे आहे प्रकरण

भाद्रपद शुक्ल चतुर्थीमध्ये घरोघरी येणाऱ्या बाप्पांप्रमाणेच माघी गणेशोत्सवातही तब्बल दोन महिने आधीच गणेश जयंतीची तयारी सुरू केली जाते. मोठमोठय़ा गणेशमूर्तींची ऑर्डर देणे, सजावट अशी कामे केली जातात. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने 100 टक्के पीओपी मूर्तींना बंदी घातल्याची माहिती मंडळ आणि मूर्तिकारांना किमान दोन महिने आधी देणे अनिवार्य होते. मात्र माघी गणेशोत्सव मंडळांच्या मंडपामध्ये बाप्पा दाखल झाल्यानंतर पालिका आणि पोलिसांकडून मंडळांना पीओपी बंदीची नोटीस बजावण्यात आल्याने वादाला तोंड फुटले होते.