जे.जे. स्कूल ऑफ आर्टसच्या प्रांगणात नाना शंकरशेट यांचे तैलचित्र

मुंबईचे आद्य शिल्पकार, थोर समाजसुधारक, शिक्षण महर्षी आणि हिंदुस्थानी रेल्वेचे जनक नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांचे भव्य तैलचित्र आज जे.जे. स्कूल ऑफ आर्टसच्या प्रांगणात विराजमान झाले. महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. संतोष क्षीरसागर यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. या भव्य तैलचित्रामुळे जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्च्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या नाना शंकरशेट यांच्या पाऊलखुणा प्रथमच जे.जे.च्या प्रांगणात उमटल्या आहेत.

मुंबई, महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील कलाक्षेत्रातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी जमशेटजी जीजीभॉय यांनी कला महाविद्यालय उभारण्याचा प्रस्ताव ठेवला. त्याला नामदार नाना शंकरशेट यांनी पाठिंबा देत या महाविद्यालयासाठी 18व्या शतकात भरघोस निधी दिला. त्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांसाठी कला शिक्षणाचे मोठे दालन उघडे झाले. परंतु जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्मध्ये नाना शंकरशेट यांचा पुतळा अथवा तैलचित्र नव्हते. ही बाब लक्षात घेऊन नामदार नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे सरचिटणीस अ‍ॅड. मनमोहन चोणकर आणि टीमने पाठपुरावा केला. त्याला यश आले आणि नाना शंकरशेट यांच्या 222 व्या जयंतीचे औचित्य साधून आज चित्रकार प्रकाश सोनावणे यांनी अतिशय हुबेहूब साकारलेले तैलचित्र जे.जे. स्कूल ऑफ आर्टस् प्रांगणात विराजमान झाले.

यावेळी कुलसचिव शशिकांत काकडे, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेट, दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष, समाजश्रेष्ठाr डॉ. गजानन रत्नपारखी, शिल्पकार विजय बुऱ्हाडे, उपाध्यक्ष दिनकर बायकेरीकर, सरचिटणीस अ‍ॅड. मनमोहन चोणकर, कोषाध्यक्ष चंद्रशेखर दाभोळकर, प्रतिष्ठान आणि परिषदेचे पदाधिकारी, नानाप्रेमी, महाविद्यालयाचे प्राध्यापक, आजी-माजी विद्यार्थी आणि शंकरशेट कुटुंबीय उपस्थित होते.

नाना शंकरशेट यांच्या प्रस्तावित स्मारक व नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस नामकरणासाठी सर    जे. जे. महाविद्यालय सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन कुलसचिव शशिकांत काकडे यांनी यावेळी दिले.