![PM-KISAN](https://www.saamana.com/wp-content/uploads/2022/01/PM-KISAN-696x447.jpg)
>>बाबासाहेब गायकवाड
पीएम किसान ‘एपीके’ या मॅसेजची लिंक उघडताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून लाखो रुपये गायब होत आहेत. या फसवणुकीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. वर्षभरात मिळणाऱ्या सहा हजारांसाठी जर मोठे आर्थिक नुकसान होत असेल तर या योजनेचा फायदा घ्यायचा की नाही, असा संभ्रम निर्माण झाला आहे.
काहींनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली आहे, तर दोन-पाच हजार रुपये गेलेल्या अनेकांनी झंझट नको म्हणून तक्रारच केलेली नाही.
PM Kisan list.APK पिंवा PM Kisan.APK अशी लिंक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर येते. ती उघडताच मोबाईल हॅक होतो. त्याचा संपूर्ण ताबा सायबर भामटय़ांकडे जातो. मोबाईलधारकाच्या बँक खात्यावरून काही मिनिटांत पैसे काढले जातात. त्याचा मेसेज काहींना येतो, तर काही वेळा हा मॅसेजही सायबर भामटे येऊ देत नाहीत. सावधानता बाळगून त्वरित सायबर पोलिसांना कळविले पिंवा सिमकार्ड ताबडतोब काढले तर खात्यातील शिल्लक रक्कम राहते अन्यथा संपूर्ण खातेच रिकामे होते. असे अनेक प्रकार झाले आहेत. काहींचे लाखो रुपये गेले आहेत, त्यांनी सायबर पोलिसांत धाव घेतल्यानंतर काहींची रक्कम परत जमा झाली आहे. तक्रार करण्यास पिंवा उपाययोजनेस विलंब झालेल्यांचे मात्र आर्थिक नुकसान भरून निघालेले नाही.
खांडबहालेंकडून धीर आणि जागृती
फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना महिरावणी येथील शेतकरी चळवळीतील, शिवसेनेचे कार्यकर्ते कैलास खांडबहाले धीर देत आहेत. सायबर पोलीस तसेच बँकेपर्यंत घेऊन जाऊन शेतकऱ्यांचे पैसे परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अशा फसव्या लिंक उघडू नका, असे सांगत ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी जागृती करीत आहेत.
मोबाईल हॅक होताच बँक खात्यातून दोन लाख गायब
नाशिकजवळील दुडगाव येथील शेतकरी राम चव्हाण यांच्या खात्यातून तब्बल एक लाख नव्याण्णव हजार नऊशे रुपये गायब झाले. सायबर पोलिसांच्या प्रयत्नांनंतर नव्याण्णव हजार रुपये परत आले. मात्र एक लाखाचे नुकसान झाले. विल्होळीतील रवींद्र झोले यांना असाच चाळीस हजारांचा फटका बसला. महिरावणी येथील विष्णू खांडबहाले यांचे गेलेले पंचावन्न हजार रुपये खात्यावर जमा झाले. याच प्रकारे सायबर भामटय़ांनी संपत चव्हाण यांचे एक लाख, रवींद्र धारबळे यांचे एक लाख तेरा हजार रुपये हडपले.