व्हॅलेंटाईन डे आधीच गुलाबाचे फूल महागले! मोजावे लागतायेत दुप्पट पैसे

सध्या व्हॅलेंटाईन डे आठवडा सुरू आहे. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाईल, परंतु त्याआधीच गुलाबाचे फूल महाग झाले आहे. 15 दिवसांपूर्वी गुलाबाचे एक फूल 15 रुपयांना मिळत होते, परंतु त्याच गुलाब फुलाची किंमत आता 25 ते 30 रुपयांवर पोहोचली आहे. बंगळुरू आणि पुण्याहून येणाऱ्या गुलाबाच्या फुलांना खास मागणी आहे.

राजस्थानच्या जयपूरमध्ये 95 टक्के गुलाब हे बंगळुरू आणि पुण्याहून येत आहेत. तसेच पुणे आणि बंगळुरूमधील गुलाब फूल विदेशातसुद्धा निर्यात केले जात आहेत. 1 फेब्रुवारीपासून फुलाची निर्यात सुरू झाली असून ही निर्यात 15 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील, असे फूल विव्रेत्यांनी सांगितले आहे. दुबई, श्रीलंकेत गुलाबाची मोठय़ा प्रमाणात निर्यात केली जात आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये दररोज जवळपास दीड लाख गुलाबाची फुले येत आहेत. व्हॅलेंटाईन डेच्या आठवडय़ात देशी गुलाबाची मागणी वाढली आहे. लग्न समारंभ सीजन सुरू असल्याने अनेक जण देशी गुलाबाला पसंती देत आहेत. शहरात एक हजाराहून अधिक फुलांची दुकाने असून रोज 150 ते 200 क्विंटल फुलांची विक्री होत आहे.