![jail-inmates](https://www.saamana.com/wp-content/uploads/2023/07/jail-inmates-696x447.jpg)
गेल्या आठवडय़ात कलबुर्गी तुरुंगाचा दरवाजा उघडला आणि 68 वर्षीय दुर्गप्पा बाहेर आला. तुरुंगातील चांगल्या वागणुकीसाठी त्याला लवकर सोडण्यात आले. तुरुंगातून सुटण्यासाठी त्याला दंडाची रक्कम म्हणून 1 लाख रुपये भरायचे होते. मात्र दुर्गप्पाकडे पैसे नव्हते. अशा वेळी तुरुंगात काम करून कमावलेले पैसे त्याच्या मदतीला आले. शिक्षेदरम्यान दुर्गप्पा तुरुंगात जेवण बनवायचे काम करायचा.
मागील 12 वर्षांत या कामाचे त्याने 2 लाख रुपये कमावले होते. हेच पैसे सुटकेसाठी त्याच्या कामी आले. कर्नाटकच्या रायचूर जिह्यातील शेतमजूर दुर्गप्पाला 2013 साली पत्नीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. दुर्गप्पाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि एक लाख रुपये दंड ठोठावला. जर हा दंड भरला नाही तर 18 महिने अधिकची शिक्षा भोगावी लागली असती. त्याला कलबुर्गी तुरुंगात ठेवण्यात आले होते. दुर्गप्पाला तुरुंगात मजुरीचे दिवसाला 100 ते 150 रुपये मिळायचे. हा रोजगार नंतर 524 रुपये करण्यात आला. दुर्गप्पाच्या बँक खात्यात 2 लाख 80 हजार रुपये जमा झाले होते. तेच पैसे दुर्गप्पाच्या कामी आले.