![ypgi akhilesh yadav](https://www.saamana.com/wp-content/uploads/2021/12/ypgi-akhilesh-yadav-696x447.jpg)
कुंभमेळ्यादरम्यान झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीवरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर निशाणा साधला आहे. अखिलेश म्हणाले की, सरकारने सर्व व्यवस्था करायला हवी होती. जर असे झाले असते तर जनतेला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागला नसता. मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की आम्ही 100 कोटी लोकं येतील या अंदाजाने व्यवस्था केली आहे. मात्र, येथे येणाऱ्या भाविकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे, याला सरकारचे गैरव्यवस्थापनच जाबाबदार आहे, असा आरोपही त्यांनी केला.
कुंभमेळ्यादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी सरकारने व्यवस्था करायला हव्या होत्या. मात्र, सरकारने याचा काहीही विचार केला नाही. असलेल्या व्यवस्था सरकारने बिघडवल्या. आपल्या राज्यात इंजिनिअर, पोलीस अधिकारी,वाहतूक अधिकारी, सनदी अधिकारी यांची कमतरता नाही. मात्र, जबाबदार अधिकाऱ्यांना संधी दिली जात नाही, तेव्हा अशा परिस्थिती उद्भवतील. सर्व निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतले. त्यामुळे गैरव्यावस्था वाढली आणि जनतेला त्रास सहन करावा लागत आहे, असेही अखिलेश म्हणाले.
अखिलेश म्हणाले की आज उत्तर प्रदेशात आयएएसची कमतरता नाही, आयपीएसची कमतरता नाही, चांगल्या अधिकाऱ्यांची कमतरता नाही. मात्र, त्या अधिकाऱ्यांना विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाई करण्यासाठी वापरले जाते. आतापर्यंत हरवलेल्यांची यादी, मृत्युमुखी पडलेल्यांची यादी, वाटेत मृत्युमुखी पडलेल्यांची यादी जाहीर झालेली नाही. ते डिजीटल कुंभमेळ्याबद्दल बोलत होते. डिजीटल व्यवस्था कुठे आहे? वाहतूक व्यवस्थापनासाठी ड्रोनचा वापर का केला जात नाही? तिथे पाणी नाही, अन्न नाही आणि कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत. आता आपण ऐकतोय की डिझेल आणि पेट्रोल संपत चालले आहे, इथे येणाऱ्या लोकांसाठी ही एक समस्या आहे. अशा समस्यांही त्यांनी मांडल्या.