38th National Games – बोर्डाच्या परिक्षेला दांडी मारणाऱ्या दिप्तीची सुवर्ण भरारी, शेतकऱ्यांच्या मुलांनी 14 वा दिवस गाजवला

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या शेतकर्‍यांच्या मुलांनी सुवर्णयशाला गवसणी देत स्पर्धेचा 14 वा दिवस गाजवला. मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये शेतकरी कुटुंबातील दिप्ती काळमेघसह सौरभ पाटीलने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. अमरावतीच्या दिप्तीने पदार्पणातच सुवर्णसह रौप्य पदकाची, तर कोल्हापूरच्या सौरभने सलग दुसर्‍यांदा सुवर्ण भरारी घेतली. विशेष म्हणजे 12 वी परिक्षेला दांडी मारत दिप्तीने सुवर्ण भरारी घेतली आहे.

गौलापार येथे सुरू असलेल्या मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये सलग दुसर्‍या दिवशी “जय महाराष्ट्रा”चा जयजयकार घुमला. बारावीत शिकणार्‍या 17 वर्षीय दिप्ती काळमेघने सकाळच्या सत्रात बायथले प्रकारात रूपेरी यश संपादन केले. दुपारच्या सत्रात दिप्तीने सौरभ पाटीलसह सोनेरी यशाला गवसणी घातली. अमरावतीच्या शेतकर्‍याची मुलगी असणारी दिप्ती ही पुण्यात शॉर्क जलतरण क्लबमध्ये शेखर खासनीस यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. दिप्ती काळमेघ ही अमरावतीच्या शिवाजी कॉलेजमध्ये बारावीत विज्ञान शाखेत शिकत आहे. मंगळवार 11 फेब्रुवारीपासून तिची बोर्ड परिक्षा सुरू होत आहे. तरीही पहिले तीन विषयाच्या पेपरला दांडी मारून तिने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खेळण्याचा मोठा निर्णय घेतला. आणि हा निर्णय सार्थकी ठरवला. 16 फेब्रुवारीला शेवटचा क्रीडाप्रकार खेळून ती अमरावतीला परिक्षा देणार आहे. राहिलेले विषयांची परिक्षा पुढील सत्रात देण्याचा धाडसी निर्णय तिने स्पर्धेपूर्वीच घेतला होता. तिच्या या धाडसी निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

मॉडर्न पेंटॅथलॉनमधील बायथले मिश्र रिले प्रकारात महाराष्ट्र सुरूवातीपासून आघाडीवर राहिला. सौरभ पाटील व दिप्ती काळमेघ जोडीने ही शर्यत 15.16.83 मिनिटांत पूर्ण करीत सुवर्ण यश खेचून आणले. मध्यप्रदेशला रौप्य, तर गुजरातला कांस्य पदक मिळाले. 1600 मीटर धावणे, 200 मीटर जलतरण आणि 1600 मीटर धावणे प्रकाराच्या वैयक्तिक बायथले शर्यत दिप्तीने 16.39.10 मिनिटांत पूर्ण करून दुसरे स्थान संपादन केले. मध्यप्रदेशच्या रमा सोनगरने सुवर्ण, तर उत्तराखंडच्या भार्गवी रावतने कांस्य पदक जिंकले. पुरूषांच्या जलतरण स्पर्धेतील वैयक्तिक प्रकारात पूर्ण कॉश्युम फाटल्याने सौरभला पदकापासून वंचित रहावे लागले. गत गोवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सौरभने 1 सुवर्ण 1 रौप्य पदक जिंकले होते. 24 वर्षीय सौरभ पाटीलही याच क्लबमध्ये गेली 8 वर्ष सराव करीत आहे. सौरभचे वडिल संजय पाटील शेतीसह पतसंस्थेत काम करतात. दिप्ती व सौरभ या दोघांनाही शेखर खासनीस हे विनामुल्य प्रशिक्षण देत आहेत.