![eknath shinde devendra fadnavis](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/11/eknath-shinde-devendra-fadnavis-696x447.jpg)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सुरू केलेली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता फडणवीसांनी शिंदेंना आणखी एक धक्का दिला आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन समितीतून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वगळल्याचे समोर आले आहे. मात्र या समितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्थान देण्यात आले आहे.
मुंबईत 2005ला आलेल्या महापूरानंतर राज्य सरकारने आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन केली होती. ही समिती आपत्तीच्या काळात मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वात काम करते. मुख्यमंत्री या समितीचे अध्यक्ष असतात. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ते या समितीच्या अध्यक्षपदी होते. मात्र आता विधानसभा निवडणूकीनंतर भाजप व मिंधे गटात सुरू असलेल्या धुसफूसीचा असर सगळ्या ठिकाणी दिसून येत आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या हातात या समितीची सूत्रे आल्यानंतर त्यांनी पहिला धक्का एकनाथ शिंदे यांना दिला आहे. एकनाथ शिंदे राज्याचे नगरविकास मंत्री असतानाही त्यांना आपत्ती व्यवस्थापन समितीतून वगळ्यात आले आहे. यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.