‘बटेंगे तो कटेंगे’, मोदींचा इंडिया आघाडीलाही संदेश, संजय राऊत यांचं मोठं विधान

बटेंगे तो कटेंगे हा संदेश मोदींनी इंडिया आघाडीलाही दिला आहे. आम्ही लोकसभा निवडणुकीत एकत्र लढलो. महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ सर्वत्र आघाडीतील प्रत्येक घटक एकमेकांसाठी काम करत होता. निवडणुकीआधी सातत्याने बैठका, चर्चा होत होती. एकमेकांशी संवाद होता. पण त्यानंतर विधानसभा निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीचे गणित जमले नाही. महाराष्ट्र, दिल्लीतही जमले नाही. असे करत मग राज्य भाजपच्या हातात द्यायची का? राज्य भाजपच्या हातात गेली तर भविष्यात लोकसभा कशी लढणार? असा रोखठोक सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. ते दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलत होते.

इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी ही काय फक्त निवडणूक लढण्यापूरती आहे का? हा प्रश्न लोकांच्या मनात आहे. निवडणुकीत हार-जित होते. महाराष्ट्र असो, दिल्ली असो किंवा राष्ट्रीय स्तरावरील प्रश्न असो… निवडणुकी व्यतिरिक्त इंडिया आघाडीने अनेक प्रश्नावर एकत्र आले पाहिजे अशी लोकांची भावना आहे, असे संजय राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, मोदींना किंवा भाजपला मतदान झाले म्हणजे ते लोकशाहीचे सर्वेसर्वा आहेत असे होत नाही. विरोधी पक्षाचे कर्तव्य विधानसभा, लोकसभेसह रस्त्यावरची लढाई लढणेही आहे. आज इंडिया आघाडी फक्त लोकसभेत दिसते, ती बाहेर दिसणेही गरजेचे आहे. आजही अनेक मोठे नेते इंडिया आघाडीत आहेत. प्रत्येकाला असे वाटते की इंडिया आघाडी ही मजबुतीने टीकायला पाहिजे आणि भाजपसमोर आव्हान उभे केले पाहिजे.

काँग्रेस हा इंडिया आघाडीतील मोठा भाऊ आहे. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असून 100 खासदार त्यांच्याकडे आहेत. त्याहून अधिक जागा जिंकण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. पण कधी, तर जेव्हा एकत्र असू तेव्हा. हे आपण लोकसभेवेळी उत्तर प्रदेश, महाराष्ट्रातही पाहिले आहे. राष्ट्रीय स्तरावरचा मोठा पक्ष म्हणून प्रत्येक बाबतीत काँग्रेसच्या नेतृत्वाने पुढाकार घेणे अपेक्षित आहे. फक्त जागावाटपात खेचाखेची करण्यासाठी आघाड्या नकोत. मोठ्या भावाचे काम समन्वयाचे आहे, निवडणुका आल्या की जागावाटपात मोठा वाटा मिळवण्याचे नाही, असेही राऊत ठणकावून म्हणाले.

राहुल गांधी यांनी जम्मू-कश्मीरमध्ये ‘भारत जोडो’ यात्रा काढली, त्याचा फायदा ओमर अब्दुल्ला यांना झालेला आहे. ‘भारत जोडो’ची सांगता श्रीनगरला झाली. जम्मू आणि काश्मीरला दोन्ही ठिकाणी राहुल गांधी यांच्या पदयात्रेला जो प्रचंड प्रतिसाद मिळाला त्याचा नक्कीच फायदा विधानसभेत ओमर अब्दुल्ला यांना मिळाला आहे. अशावेळी काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्सने सामंजस्याची भूमिका घेणे आवश्यक आहे. आज ओमर अब्दुल्ला सगळ्यांना सांगतात की आपापसात भांडा… भांडा.. पण तुम्ही जम्मू-काश्मीरला भांडतच आहात ना. तुम्ही कुठे काँग्रेसला त्यांचा वाटा दिला आहे, असा सवाल राऊत यांनी केला.