![navi mumbai munciple corporation](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/08/navi-mumbai-munciple-corporation--696x447.jpg)
समान काम समान वेतन धोरण लागू करण्यास नवी मुंबई महापालिका प्रशासनाने टाळाटाळ केल्याने उद्यापासून महापालिकेचे 8 हजार 50 कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत. गेल्या दोन दिवसांत या कामगारांबरोबर प्रशासनाने कोणतीही चर्चा केली नाही आणि तोडगा काढण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यामुळे हा संप चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पहिले दोन दिवस हे आंदोलन फक्त घनकचरा विभागापुरते मर्यादित राहणार आहे. मात्र प्रशासनाची दुर्लक्ष करण्याची हिच भूमिका कायम राहिली तर त्यानंतर पाणीपुरवठा, स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार आणि शवविच्छेदन या सेवाही बंद करण्यात येणार आहेत, असा इशारा कामगारांनी दिला आहे.
समाज समता कामगार संघाच्या नेतृत्वाखाली छेडल्या जात असलेल्या या आंदोलनाला कामगारांच्या सर्वच संघटनांनी पाठिंबा दिला आहे. कामगारांच्या प्रतिनिधींनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये समान काम समान वेतन हे धोरण लागू करण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी ठोस आश्वासन द्यावे अशी मागणी केली होती. मात्र या मागणीची महापालिका प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही, असे मंगेश लाड यांनी सांगितले.
संप मोडून काढण्याचा घाट
कंत्राटी कामगारांनी एक महिनाभर महापालिकेच्या मुख्यालयासमोर साखळी उपोषण केले. मात्र त्याची दखल प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे कामगारांनी बेमुदत संपावर जाण्याची घोषणा केली. त्यानंतरही पालिका प्रशासनाने यावर तोडगा काढण्याऐवजी हा संप मोडून काढण्यासाठी जीवाचा आटापिटा सुरू केला आहे. हा संप मोडण्यासाठी काही राजकीय नेत्यांचे पाठबळही प्रशासनाला मिळत आहे, अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.
आमचा हा लढा नवी मुंबईकरांना वेठीस धरण्यासाठी नाही तर महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या अन्यायाविरोधात आहे. दोन दिवस जर समान काम समान वेतनाबाबत प्रशासनाने निर्णय घेतला नाही तर त्याचा अन्य सेवांवर परिणाम होणार आहे.
दोन दिवसांनी रुग्णालयातील साफसफाई, शवविच्छेदन, स्मशानभूमीतील अंत्यसंस्काराचे काम बंद करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा आणि उद्यान विभागात काम करणारे कामगारही आपले काम थांबवून आंदोलनात सहभागी होणार आहेत.
पालिकेच्या अधिकाऱ्यांचे कानावर हात महापालिकेच्या विविध विभागांत काम करणारे सुमारे 8 हजार 50 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर जाणार आहेत. या आंदोलनाबाबत नवी मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले आहेत.
अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन उचलला गेला नाही, फक्त रिंग वाजत राहिली. कामगारांची पत्रकार परिषद झाल्यानंतर पालिकेच्या एकाही अधिकाऱ्याने या आंदोलनाबाबत पालिकेची भूमिका जाहीर केलेली नाही. प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यामुळे कंत्राटी कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.