![Untitled design](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Untitled-design-15-696x447.jpg)
हिंदुस्थानात मोठय़ा प्रमाणावर रोजगार आणि उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचेच समोर आले आहे. विशेष म्हणजे मोदींच्या गुजरातमधील नागरिकच मोठय़ा संख्येने अमेरिकेत उज्ज्वल भविष्याच्या शोधात स्थलांतर करत असल्याचे उघड झाले आहे. कारण, अमेरिकेतील बेकायदा स्थलांतरितांमध्ये गुजरातीच पहिल्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, अमेरिकन सीमाशुल्क आणि सीमा सुरक्षा विभागाच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना तब्बल 90 हजार 415 हिंदुस्थानींना अटक करण्यात आली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधातील कारवाई अधिक तीव्र झाली आहे. रोज 1200 बेकायदेशीर स्थलांतरितांना पकडण्यात येत असल्याचे वृत्त आहे. एपूण दहा लाख बेकायदेशीर स्थलांतरितांना पकडण्याची योजना असून सध्याच्या घडीला डिटेन्शन सेंटर्स अक्षरशः भरली आहेत. बेकायदेशीर स्थलांतरितांना थेट तुरुंगात टाकले जात आहे, अशी माहिती पुढे येत आहे.
रशिया–युक्रेन युद्ध संपवण्यावर चर्चा
डोनाल्ड ट्रम्प रशिया आणि युक्रेन युद्ध संपवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. अलीकडेच ट्रम्प यांनी युद्ध संपवण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले होते. त्यांनादेखील युद्ध नको आहे. नागरिकांचे असे रोज मरणे त्यांनाही नको आहे, असे ट्रम्प म्हणाले. दरम्यान, 2022 मध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर ट्रम्प आणि पुतीन यांच्यात युद्ध संपवण्याबद्दल पहिल्यांदाच चर्चा झाली आहे.
खतरनाक कैद्यांसोबत राहावे लागत आहे
लॉस एंजेलिस, मियामी, अटलांटा आणि कॅन्सरसह नऊ ठिकाणच्या तुरुंगांमध्ये खतरनाक कैद्यांसोबत स्थलांतरितांनाही ठेवण्यात येत आहे. इमिग्रेशन अँड कस्टम एन्फोर्समेंट डिटेंशन सेंटरमध्ये केवळ 41,000 लोकांना ठेवण्याची क्षमता असून या पेंद्रांमध्ये सुमारे 2 हजार हिंदुस्थानी असल्याची माहिती आहे. दरम्यान रोज 1200 बेकायदेशीर स्थलांतरितांना अटक केली जात असल्याचे अमेरिकेच्या गृहब सुरक्षा सचिव क्रिस्टी नियोम यांनी सांगितले.
तुरुंगात प्रचंड हाल; अन्न शिळे आणि दुर्गंधीयुक्त
तुरुंगातील स्थिती अत्यंत भयावह असल्याचे अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियनने म्हटले आहे. बेकायदेशीर स्थलांतरितांना वेळेवर जेवण दिले जात नाही. त्यांना वाटण्यात येणारे अन्न शिळे आणि दुर्गंधीयुक्त असून कडाक्याच्या थंडीत बेकायदेशीर स्थलांतरितांना जमिनीवर झोपावे लागत आहे. त्यांना अत्यंत जुन्या कोठडीत डांबले जात असून दिवसभरात केवळ अर्ध्या तासासाठी त्यांना कोठडीतून बाहेर काढले जाते.
दोन वर्षांत अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना 90 हजार 415 हिंदुस्थानींना अटक करण्यात आली. याकैकी 43 हजार 746 लोकांना कॅनडाच्या बाजूने ओलांडताना आणि उर्वरित मेक्सिकोतून अटक करण्यात आली. अटक केलेल्यांकैकी निम्मे गुजरातचे आणि बरेच जण पंजाब आणि आंध्र प्रदेशचे होते.
2009 पासून 15756 बेकायदेशीर हिंदुस्थानींना परत पाठवण्यात आले आहे. 2024 मध्ये कागदपत्रांच्या अभावी अमेरिकेतून 1500 हून अधिक हिंदुस्थानींना हद्दपार करण्यात आले.