Dapoli News – महिला पर्यटकांना घेऊन आला अन् वाहनचालकाला सेल्फीचा मोह महागात पडला

दोपीलीमध्ये लाडघर येथील समुद्र किनाऱ्यावर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी शनिवार, रविवार पर्यटकांची गर्दी होत असते. सर्व वयोगटातील पर्यटक बीचवर समुद्राच्या लाटांचा आणि निसर्गाचा आनंद घेत असतात. असाच एक महिला पर्यटकांचा ग्रूप पुण्यावरुन टेम्पो ट्रॅव्हलर करुन समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आला होता. परंतु यावेळी टेम्पो ट्रॅव्हलर चालकाने सेल्फी काढण्याच्या नादात चक्क टेम्पो ट्रॅव्हलरच पाण्यात घातला.

सांगली येथील मुळ रहिवाशी असलेला एक वाहन चालक 17 सिटर टेम्पो ट्रॅव्हलर घेऊन पूणे येथील महिला पर्यटकांना दापोली येथे पर्यटनासाठी घेऊन आला होता. त्याने त्या महिला पर्यटकांना हॉटेलमध्ये उतरवले आणि तो एकटाच लाडघर येथील समुद्रकिनाऱ्यावर टेम्पो ट्रॅव्हलर घेऊन आला. लाडघर येथील स्वच्छ सुंदर समुद्र किनारा आणि निळ्याशार पाण्याच्या फेसळणाऱ्या समुद्राच्या लाटा पाहताच त्याने समुद्राच्या पाण्यात टेम्पो ट्रॅव्हलर घातली आणि तो वेगवेगळ्या अॅँगलने सेल्फी काढू लागला. वेगवेगळ्या अॅगलमध्ये सेल्फी काढण्याच्या नादात त्याला टेम्पो ट्रॅव्हलर समुद्राच्या पाण्यात केव्हा रूतला हे समजलेच नाही. स्थानिक पर्यटन व्यवसायिक मदतीसाठी धावून आले मात्र पुळणीत खोलवर रुतलेला टेम्पो ट्रॅव्हलर आणि त्यातच समुद्राच्या पाण्याला आलेली भरती यामुळे दोरखंडाने ओढूनही वाहन पाण्यातून बाहेर निघेना. अखेर मध्यरात्री पाणी ओहोटल्या नंतर जेसीबीच्या सहाय्याने टेम्पो ट्रॅव्हलर बाहेर काढण्यात आला आहे.