CM Biren Singh Resignation : गेल्या दोन वर्षांपासून जळतंय मणिपूर, अखेर एन. बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा दिला राजीनामा

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी मणिपूरच्या राजभवनात राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. आजच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली होती. राज्यात गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या हिंसाचारामुळे त्यांना टीकेचा सामना करावा लागत होता. पक्षाचे अनेक आमदारही त्यांच्यावर नाराज होते. यानंतर अखेर त्यांनी आज राजीनामा दिला आहे.

राज्यपालांना सुपूर्द केलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी लिहिले आहे की, ”मी, नोंगथोम्बम बिरेन सिंह, मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत आहे. मणिपूरच्या लोकांची सेवा करणे हा माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मणिपूरच्या प्रत्येक नागरिकाचे हित जपण्यासाठी केंद्र सरकारच्या वेळेवर केलेल्या कृती, हस्तक्षेप, विकास कामे आणि विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीबद्दल मी त्यांचे अत्यंत आभारी आहे. केंद्र सरकारला माझे प्रामाणिक आवाहन आहे की, त्यांनी अशाच पद्धतीने काम करत राहावे.” दरम्यान, मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राज्यातील त्यांच्या नेतृत्वाबद्दल भाजपमधील वाढता असंतोष शांत करण्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, असं बोललं जात आहे.