सरदार पटेलांच्या मूळ गावच्या नागरिकांचे गुजरातच्या भाजप सरकारविरोधात आंदोलन; कारण काय? वाचा…

तब्बल 27 वर्षांनंतर दिल्ली मोठा विजय मिळवल्यानंतर भाजप आनंदोत्सव साजरा करत आहे. मात्र दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गृहराज्य गुजरातमध्ये देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचं गाव असलेल्या करमसदचे नागरिक सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. हे आंदोलन सरदार पटेल यांचं गाव करमसद आणंद महानगरपालिकेत समाविष्ट करण्याच्या विरोधात करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने राज्यातील केवडिया येथे सरदार पटेलांचा सर्वात उंच पुतळा बसवण्यात आला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पुतळ्याची उभारणी 3000 कोटी रुपये खर्चून करण्यात आली आहे. आता याच गावच्या लोकांनी सरकारविरोधात आंदोलन पुकारलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात सरकारने नुकतेच आणंद नगरपालिकेला महानगरपालिका म्हणून घोषित केले आहे. यामध्ये करमसद गावाचाही समावेश करण्यात येणार आहे. सरकारने या संदर्भात आदेशही जारी केले आहेत. याच विरोधात गावकरी आंदोलन करत आहेत. सरदार पटेल यांचं मूळ गाव स्वतंत्र स्वरुपातच राहू द्यावं, अशी मागणी आंदोलक गावकऱ्यांनी केली आहे. त्यांनी करमसद वाचवा मोहीमही सुरू केली आहे. यासाठी ‘मीही सरदार’ असा नारा आंदोलक गावकऱ्यांनी दिला आहे.