कॅच घेताना चेंडू चेहऱ्यावर आदळला, रचिन रविंद्र रक्तबंबाळ झाला; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ व्हायरल

न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रविंद्र याला पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या त्रिकोणी मालिकेदरम्यान गंभीर दुखापत झाली आहे. पाकिस्तानविरुद्ध पहिल्या लढतीत सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना रचिन रक्तबंबाळ झाला. कॅच घेताना चेंडू चेहऱ्यावर आदळल्याने रचिनचा चेहरा रक्ताने माखला. त्यामुळे त्याला तातडीने वैद्यकीय मदतीसाठी मैदानाबाहेर नेण्यात आले. पाकिस्तानच्या डावातील 38व्या षटकामध्ये घडलेल्या या प्रकारामुळे क्रीडाचाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

पाकिस्तानचा फलंदाज खुसदिल शाह याने मायकल ब्रेसवेलच्या गोलंदाजीवर स्वॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू वेगाने डीप स्क्वेअर लेगकडे गेला. तिथे सीमारेषेवर रचिन रविंद्र क्षेत्ररक्षण करत होता. कॅच घेताना फ्लड लाईट्समुळे रचिन चेंडू नीट पाहू शकला नाही. त्यामुळे चेंडू त्याच्या हातातून निसटला आणि जोरात चेहऱ्यावर आदळला.

रक्तबंबाळ अवस्थेत काही वेळ रचिन जमिनीवर पडून होता. झाला प्रकार लक्षात येताच फिजिओंनी मैदानात धाव घेतली आणि प्रथमोपचार करुन रचिनला मैदानाबाहेर नेण्यात आले. रचिनच्या कपाळाला दुखापत झाली असून ती किती गंभीर आहे, याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

या लढतीबाबत बोलायचे झाल्यास न्यूझीलंडने हा सामना 78 धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ग्लेन फिलिप्सच्या शतकी (74 चेंडूत नाबाद 106 धावा) खेळीच्या बळावर 50 षटकात 6 बाद 330 धावा केल्या. फिलिप्सला डेरेल मिशेलने 81 आणि केल विलियम्सने 58 धावांची खेळी करत उत्तम साथ दिली.

न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले आव्हान पाकिस्तानला पेलवले नाही. पाकिस्तानचा संपूर्ण संघ 47.5 षटकांमध्ये 252 धावांमध्ये गारद झाला. बऱ्याच अवधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या फखर जमान याने 69 चेंडूत 84 धावांची खेळी केली. मात्र इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने पाकिस्तानला पराभव झाला. न्यूझीलंडकडून मिशेल सँटनर आणि मॅट हेन्रीने प्रत्येकी 3, तर मायकल ब्रेसवेलने 2 विकेट्स घेतल्या.