![kirodi lal meena](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/kirodi-lal-meena-696x447.jpg)
राज्यात भाजप सरकारच्या काळात विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळीही फोन टॅपिंगचा मुद्दा गाजला होते. हेच लोण आता राजस्थानमध्येही पोहोचले आहे. अर्थात तिथे विरोधी पक्षाने नाही तर सत्ताधारी मंत्र्यांनीच आपला फोन टॅप होत असल्याचा आणि आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.
राजस्थानचे कॅबिनेट मंत्री किरोडीलाल मिणा यांनी स्वत:च्याच सरकारविरुद्ध फोन टॅपिंगचा आणि पाळत ठेवल्याचा आरोप केला आहे. जयपूरमधील एका मंदिरात बोलताना त्यांनी हा आरोप केला. याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजस्थानच्या राजकारण खळबळ उडाली असून काँग्रेसने मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
राज्यातील कथित भ्रष्टाचाराबाबत बोलताना कॅबिनेट मंत्री किरोडीलाल मिणा यांनी फोन टॅपिंगचा आरोप केला. ते म्हणाले, भाजप सरकार सत्तेवर आल्यावर परिस्थिती बदलेल आणि भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई होईल अशी आशा होती. हेच मुद्दे आम्ही जनतेसमोर मांडले होते आणि जनतेचा पाठींबाही आम्हाला मिळाला. पण भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई झाली नाही.
परीक्षा घोटाळ्याबाबत मी आवाज उठवा असता सरकारने माझ्यामागे सीआयडी लावली, माझ्यावर पाळत ठेवली आणि फोन टॅप केला, असा आरोप किरोडीलाल मिणा यांनी केला. या आरोपांमुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह दोतासरा आणि माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना सरकारविरोधात आयते कोलीत मिळाले आहे.
भाजपचे नेतेच स्वत:च्या सरकारवर फोन टॅपिंगचा आरोप करत आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री यावर सभागृहात उत्तर देत नाही तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते टिकाराम जुली यांनी दिला आहे. याच मुद्द्यावरून शुक्रवारी राजस्थानच्या विधानसभेमध्ये गोंधळ झाला. मात्र किरोडीलाल मिणा यांचे हे आरोप सरकारने फेटाळून लावले आहेत. त्यांच्यावर कारवाईही होण्याची शक्यता आहे.