![school-girl-missing](https://www.saamana.com/wp-content/uploads/2020/02/school-girl-missing-696x447.jpg)
शाळेतून घरी पाठांतरासाठी दिलेला अभ्यास पूर्ण न झाल्याने शिक्षक रागावतील या भीतीने अन् रात्रीपासून पोटात अन्नाचा कण नसल्याने ती भोवळ येऊन पडली. त्यामुळे तिने चक्क अपहरणाचा खोटा बनाव रचला. तब्बल 12 तास पोलीस यंत्रणा कामाला लागली. शेवटी तिने अपहरणाचा बनाव केल्याची कबुली पोलिसांना दिली. तिने दिलेल्या जबाबानंतर पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या 100 मीटरवर असलेल्या पारिजातनगरात रस्त्यावरून पायी शाळेत जाणाऱ्या मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ मुलीला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. तिचे मेडिकल केले. पोलीस अधिकाऱ्यांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. मुलीचा जबाब घेण्यासाठी दक्षता समितीच्या सदस्यांनाही बोलावले. या प्रक्रियेत 12 तास गेले.
या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांना पोलीस ठाण्यात बोलवून घेतले. मुलीची चौकशी करत असताना ते सोबत होते. आई रागावेल या भीतीमुळे ती अपहरण झाल्याचे सांगत होती. मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर मुलगी खोटे बोलत असल्याचे स्पष्ट झाले. आई-वडिलांना बाहेर पाठविल्यानंतर मुलीला विश्वासात घेतल्यावर तिने अभ्यास न झाल्यामुळे मी घाबरले व मला भोवळ आली. अपहरणाची बातमी समजल्यामुळे मला भीती वाटत असल्याने मी हा बनाव केला, अशी कबुली दिली. पोलिसांनी या प्रकरणी मुलीसह तिच्या आई-वडिलांचे समुपदेशन करून त्यांना घरी पाठविले.