रमाई जयंतीचा बॅनर समाजकंटकाने फाडल्याने कोपरगावात तणाव, आंदोलकांनी अहिल्यानगर-मनमाड रस्ता अडवला

शहरामध्ये माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त रस्त्यावर लावलेले फलक अज्ञात इसमाने फाडल्याने तणाव निर्माण झाला आहे. गेल्या चार दिवसांत वेगवेगळ्या दोन ठिकाणी फलक फाडले गेल्याने शनिवारी (दि. 8) याचे तीव्र पडसाद शहरात उमटले. या घटनेच्या निषेधार्थ भीमसैनिकांनी कोपरगाव बंदची हाक देताच व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत कोपरगाव बंद ठेवले. पोलिसांनी आश्वासित केल्यानंतर सायंकाळी पाच वाजता आंदोलन स्थगित करण्यात आले.

कोपरगाव शहराच्या धारणगाव रस्त्यावरील माधवबाग या ठिकाणी माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त बॅनर लावण्यात आले होते. यातील एक बॅनर अज्ञात समाजकंटकाने धारदार शस्त्राने फाडल्याने मोठा तणाव निर्माण झाला. या अगोदर 4 फेब्रुवारी रोजी अज्ञात इसमाने छत्रपती संभाजी महाराज सर्कल येथे डॉ. बारहाते डायग्नोस्टिक सेंटरच्या समोर, धारणगाव रोड येथे माता रमाई जयंतीनिमित्ताने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांचे लावण्यात आलेले बॅनर चार ठिकाणी फाडून त्याचे नुकसान केले होते. यावेळी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून भीमसैनिकांना शांत केल्याने तणाव निवळला होता. परंतु, शनिवारी पुन्हा याच गोष्टीची पुनरावृत्ती झाल्याने शहरात मोठा तणाव निर्माण झाला. संतप्त भीमसैनिक रस्त्यावर उतरले होते. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच समाजकंटकांचे धाडस वाढल्याची भावना भीमसैनिकांमध्ये होती. यावेळी कोपरगाव शहर बंदचे आवाहन करण्यात आल्याने सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली.

दरम्यान, पोलीस उपअधीक्षक शिरीष वमणे, पोलीस निरीक्षक भगवान मधुरे, पोलीस निरीक्षक संदीप कोळी आदींनी आंदोलनकर्त्यांची समजूत घातली. परंतु, समाजकंटकास अटक होईपर्यंत ठिय्या आंदोलन चालूच राहील, असा पवित्रा आंदोलनकत्यांनी घेतल्याने तणावाचे वातावरण झाले आहे. जमावातून सकाळी दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यास वेळीच आवर घातला. मात्र, काही आक्रमक भीमसैनिकांनी अहिल्यानगर – मनमाड महामार्ग अडवल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूला चार किलोमीटरपर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्या लागल्या होत्या. या ठिकाणी पोलिसांनी समजूत काढल्यानंतर आंदोलकांनी महामार्ग मोकळा करून दिल्याने वाहतूक सुरळीत झाली.

पोलीस उपअधीक्षक शिरीष वमणे, पोलीस निरीक्षक भगवान माथुरे, पोलीस निरीक्षक संदीप कोळी तसेच व्यापारी महासंघातर्फे सुधीर डागा यांनी आंबेडकर पुतळ्यानजीक रस्त्यावर मांडलेल्या ठिय्या आंदोलनास भेट दिली. यावेळी भीमसैनिकांनी घटनेचा निषेध व संताप व्यक्त केला. याप्रसंगी श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक वैभव बरमे यांनी तातडीने आरोपीला पकडण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर, सायंकाळी पाच वाजता आंदोलन स्थगित करण्यात येऊन तणाव निवळला.