विदेशातील तुरुंगात 10,152 हिंदुस्थानी कैदी, सरकारची लोकसभेत माहिती

विदेशातील तुरुंगामध्ये एकूण 10,152 हिंदुस्थानी कैदी असल्याची माहिती परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी लोकसभेत दिली. या कैद्यांमध्ये न्यायालयीन कैद्यांचाही समावेश आहे. लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना सिंह यांनी विदेशातील तुरुंगात खटला सुरू असलेले आणि दोषसिद्धी झालेल्या कैद्यांची आकडेवारी सादर केली. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या तुरुंगात अनुक्रमे 2,633 आणि 2,518 कैदी असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले.

पाकिस्तान आणि श्रीलंकेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या तुरुंगात अनुक्रमे 266 आणि 97 हिंदुस्थानी कैदी आहेत, तर नेपाळच्या तुरुंगात 1,317 हिंदुस्थानी नागरिक कैद आहेत. न्यायालयीन कैदी आणि शिक्षा भोगत असलेले असे एकूण 10,152 कैदी चीन, इस्रायल, रशिया, स्पेन, श्रीलंका, अमेरिका, पाकिस्तान, नेपाळ, कतार, यूएई, कुवैत, बांगलादेश, अर्जेंटिना आणि सौदी अरेबिया यांसह विविध 86 देशांच्या तुरुंगात आहेत. विदेशातील तुरुंगात असलेल्या सर्व हिंदुस्थानी कैद्यांना सहकार्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे राज्यमंत्री सिंह यांनी स्पष्ट केले. तसेच विदेशात एखाद्या हिंदुस्थानी नागरिकाला अटक केल्यास त्याची माहिती तत्काळ तेथील दूतावासाला दिली जाते. मग परराष्ट्र कार्यालयातील अधिकारी संबंधित कारागृहाशी संपर्क साधून अटक केलेल्या नागरिकाला मदत करण्याचे काम करतात. त्याच्या अटकेचे तथ्य पडताळून दूतावासात जाण्याची परवानगी दिली जाते, असेही त्यांनी नमूद केले.

कतारमध्ये 611 हिंदुस्थानी कैदी

कतार येथे फिफा विश्वचषकाची स्पर्धा झाल्यानंतर केरळमधील बहुतांश नागरिकांना तुरुंगात डांबण्यात आले. सरकार याबाबत अवगत आहे का, असा प्रश्न लोकसभेत विचारण्यात आला. त्यावर सिंह म्हणाले की, कतारच्या तुरुंगात 611 हिंदुस्थानी कैदी आहेत. गोपनीयतेचा कायदा असल्यामुळे कैद्यांच्या संमतीशिवाय कतार सरकार त्यांची माहिती उघड करू शकत नाही. त्यामुळे कोणत्या राज्यातील किती कैदी आहेत याची आकडेवारी मिळू शकली नाही.