उकाड्याने मुंबईकरांचा घामटा काढला, पारा 36 अंशांवर पोहोचणार

गेल्या दोन दिवसांपासून शहरासह उपनगरात कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली असून उकाड्याने मुंबईकरांचा अक्षरशः घामटा निघाला आहे. शनिवारी मुंबई शहरात कमाल 34 अंश सेल्सिअस तर किमान 21.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर उपनगरात कमाल 34.5 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20.5 अंश सेल्सिअसवर पोहोचले.

पूर्वेकडून येणाऱया उष्ण वाऱयांमुळे मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पुढील 24 तासांमध्ये कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअसवर पोहोचण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामानतज्ञांनी वर्तविला आहे. मुंबईसह राज्याच्या इतर भागांतही उन्हाचा कडाका वाढला असून कमाल तापमान हे 35 ते 36 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. पुढील काही दिवस राज्यातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिकच राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.