सीबील स्कोअर चांगला नसल्यावर बँका कर्ज नाकारतात हे सर्वांनाच माहित आहे. मात्र महाराष्ट्रातील मुर्तिजापूरमध्ये एक अनोखी घटना घडली आहे. नवरेदवाचा सीबील स्कोअर चांगला नसल्याने चक्क वधू पक्षाने लग्न करण्यास नकार दिल्याची घटना घडली आहे. ही घटना सध्या सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, महाराष्ट्रातील मुर्तिजापूरमध्ये एका मुलीचा विवाह ठरला. मुला-मुलीने एकमेकांना पसंती दर्शवली. सगळं ठरलं. त्यांच्या लग्नाबाबत चर्चा करण्यासाठी एक अखेरची बैठक बोलावण्यात आली होती. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना भेटून लग्नाची बोलणी सुरु केली. त्यानंतर अचानक मुलीच्या काकांनी मुलाचा CIBIL स्कोअर तपासण्याची मागणी केली.त्यासाठी मुलीच्या काकांनी पॅन कार्ड नंबर घेतला आणि CIBIL स्कोअर तपासला .
मिळालेल्या माहितीनुसार, नवरदेवाचा सिबील स्कोअर तपासल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. त्याच्या नावावर बरीच कर्जे आहेत. त्याने विविध बँकांकडून कर्ज घेतले होते. याशिवाय, त्याचा CIBIL स्कोअर देखील खूप कमी होता. कमी CIBIL स्कोअर म्हणजे त्या व्यक्तीचा आर्थिक इतिहास चांगला नव्हता. तो कर्ज फेडण्यात डिफॉल्टर होता. यावर मुलीच्या काकांनी वराला आधीच आर्थिक समस्या आहेत आणि त्यामुळे तो त्याच्या पत्नीला आर्थिक स्थैर्य देऊ शकणार नाही. त्यांचा मुद्दा घरातील अन्य सदस्यांनाही पटला आणि त्यांनी हे लग्न मोडले.