ज्येष्ठ क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरींच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी रविवारी 9 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजता दादरच्या सूर्यवंशी क्षत्रिय सभागृहात आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही आदरांजली सभा सर्वांसाठी खुली ठेवण्यात आली आहे.
‘पप्पू’ या टोपण नावाने मित्रांमध्ये, चाहत्यांमध्ये प्रसिद्ध असलेल्या संझगिरींनी आपल्या पाच दशकांच्या लेखन प्रवासात हजारो लेख, शेकडो संगीताचे प्रयोग, शेकडो एकपात्री कार्यक्रम आणि 40 पुस्तकांचा खजिना आपल्या चाहत्यांना दिला. आपले सारे आयुष्य मनमुरादपणे जगलेल्या या ‘अवलिया’ विषयी गेल्या दोन दिवसात हजारो चाहत्यांनी, मित्रांनी सोशल मीडियावर भन्नाट आठवणी आणि किस्से व्यक्त केलेत. यावरून त्यांचे लेख, त्यांचे कार्यक्रम प्रत्येकाच्या मनावर किती अधिराज्य गाजवत होते, याची कल्पना सर्वांना आली आहे. तसे पाहता संझगिरी हे सर्वांचेच लाडके होते. त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वांनाच आमंत्रण दिले आहे आणि आपल्या आठवणींना उजाळा देण्याचे आवाहन केले आहे.