सिनेमा – एक ‘आगळी’ प्रेमकथा

>> प्रा. अनिल कवठेकर

अमोल पालेकरच्या कौटुंबिक चित्रपटांच्या दशकात (1970-80) हाणामारीचे चित्रपटही येत होते. त्यातला अमोल पालेकरचा साधासुधा नायक प्रेक्षकांना आवडत होता. इतर चित्रपटांइतके नाही, पण त्याचे चित्रपट हिट होत होते. मला वाटतं, ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ हा चित्रपटही तशाच पठडीतला आहे. फक्त तो आजच्या जमान्यातला आहे, श्रीमंत आहे. त्यामुळे चकाचकपणा आहे. अमेरिकेतली न पाहिलेली ठिकाणंही आहेत. तिथली ऑफिसेस, रस्ते, गॅरेज, हॉटेल्स… सगळं सुंदर आहे. या सौंदर्याबरोबर या चित्रपटाची कथा मात्र खूपच वेगळी आहे. नायक फिमेल रोबोटच्या प्रेमात पडतो आणि तो रोबोट इतका आधुनिक आणि खरा आहे की, तो रोबोट असूनही एक स्त्री वाटतो. रोबोट आणि नायकाची प्रेमकथा एक वेगळा विषय म्हणून एन्जॉय करता येण्यासारखा आहे.

आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या संदर्भात चर्चा करताना अनेक जण त्यातील धोके अशा प्रकारे सांगतात की, त्यामुळे देशाचं, समाजाचं, व्यक्तीचं काय नुकसान होऊ शकतं? लेखकाची, दिग्दर्शकाची, लोकेशनची याला कसलीच गरज उरणार नाही. तुम्हाला हवं ते त्या रोबोटमार्फत करून घेता येईल, पण कोणीही प्रेम या भावनेला म्हणजे दोन व्यक्तींमधील होणाऱया प्रेमाच्या भावनेला हात घातलेला नव्हता. तो या चित्रपटातून पाहायला मिळतो. त्याकरिता कथालेखकाला दाद द्यायलाच हवी.

आर्यन अग्निहोत्री (शाहीद कपूर) एक श्रीमंत आयटी इंजिनीअर आहे. त्याच्या मावशीची अमेरिकेत एक मोठी रोबोटिक कंपनी आहे. आर्यनला त्याच्या मनासारखी एक मुलगी हवी आहे, पण त्याच्या आईला ती काही भेटत नाही. आपल्या मुलाचं लवकर लग्न व्हावं म्हणून ती प्रयत्न करते. तशी स्वप्नं पण आर्यनला पडत असतात. त्याची मावशी त्याला अमेरिकेत बोलावते. आई लग्नासाठी मागे लागते म्हणून तो अमेरिकेला जातो. तिथे त्याची मावशी त्याच्या सेवेला तिची सिफरा (क्रिती सेनन) नावाची असिस्टंट देते, जी रोबोट असल्याने तिला सगळ्या भाषा येतात. जगातील सगळं ज्ञान, सगळ्या गोष्टी तिला माहीत आहेत. तिच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाने आर्यन तिच्या प्रेमात पडतो. तिच्या प्रश्नांची उत्तरं ऐकून तो अगदी भारावून जातो. तो तिला विचारतो की, तुला प्रेम करायला कसा तरुण आवडेल? तेव्हा ती तिच्या पाच अटी सांगते. त्या पाचही अटी आर्यनला लागू होतात. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात.

ती पहिल्यांदा त्याला समजेल अशा भाषेत सांगते की, मला माझ्या रूममध्ये जायला हवं. कारण माझी बॅटरी लो झालेली आहे, पण त्याला तो प्रेमाचा इशारा वाटतो. त्याची मावशी कुठल्या तरी महत्त्वाच्या सेमिनारला गेलेली असते. ती चार दिवसांनी येणार असते, पण ती दुसऱयाच दिवशी येते आणि त्याचा गोंधळ उडतो. तो एका रोबोटच्या प्रेमात पडल्याचं त्याला माहीत नसतं. त्याला मावशीची अडचण वाटते. मावशीच्या हे लक्षात येतं. मावशी त्याला सिफरा कुठे आहे हे विचारते. तो सांगतो की, तिला ताप आल्याने ती झोपली आहे. मावशी कन्फ्युज्ड होते. कारण मावशीला ती रोबोट आहे हे माहीत असतं.

ती सिफराला पाहायला जाते. “सिफराची बॅटरी संपलेली आहे. तिला चार्ज व्हायला वेळ लागेल.’’ असे मावशीने सांगितल्यानंतर त्या क्षणाला त्याला कळतं की, ती रोबोट आहे. त्याच्या मावशीने तेरा वर्षे मेहनत करून कुणालाही ओळखता येणार नाही अशी एक फिमेल रोबोट तयार केलेली आहे. ही सिफरा नावाची रोबोट माणसाच्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण करू शकते, पण तो कन्फ्युज्ड आहे. हे असं कसं झालं? ती त्याला उत्तर देते, पण त्याचा गोंधळ उडालेला आहे. मावशीला हे असं घडणार याची कल्पना असते. कारण तिला आर्यनसारखाच प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा माणूस (गिनिपिग) प्रयोगासाठी हवा असतो. तिनेच सिफराला आर्यनच्या सगळ्या आवडीनिवडी सांगितलेल्या असतात आणि तिचा तो प्रयत्न यशस्वी झालेला असतो. ती त्याला सांगते, पण तो धक्क्यातून अजून बाहेर आलेला नसतो.

त्याला ती रोबोट असल्याचं माहीत झाल्यानंतर सिफरा त्याच्या जवळ येते. तो ऑनलाइन फुटबॉल खेळत असतो. ती म्हणते, मी खेळू का? तो तिला विचारतो, तू कधी हरलीस का? ती म्हणते, कधीच नाही. मग तो म्हणतो, काय उपयोग?… आणि तिच्या चेहऱयावरचे भाव बदलतात. ती रोबोट असली तरी तिला भावना आहेत. इथून त्याच्याही आवाजात बदल होतो. अमेरिकेत येताना जो उत्साह त्याच्यात होता, जे चैतन्य त्याच्या जगण्यात दिसत होतं ते एका क्षणात नाहीसं झालेलं असतं.

दिवस दुसरा… जेवणाच्या टेबलावर मावशी सिफराला ती अपसेट का आहे? याबद्दल विचारते. ती म्हणते, “आर्यन अपसेट आहे. म्हणून मी अपसेट आहे.’’ तसं आर्यन स्पष्ट शब्दांत सांगतो की, “मला माहीत नव्हतं ती रोबोट आहे. ज्या क्षणी समजलं. त्या क्षणापासून मला कळत नाही की, मी कसं व्यक्त व्हावं.’’ माणसाला सुंदर प्रेमिका हवी असते, पण ती मनुष्य रूपातली हवी. तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी माणूस तसाच आहे.रोबोट होणं आणि मुलगा किंवा मुलगी म्हणून जन्माला येणं या दोन्ही गोष्टी कोणाच्याही हातात नसतात. तो मावशीसमोर कबूल करतो की, मी तिच्या प्रेमात पडलोय. तो मावशीला सांगतो की, प्रेम म्हणजे काय हे तिला माहीत नाही. कारण ते खूप वेगळं असतं. तिचं तसं प्रेम कोणावरही जडलं नाही.

मुंबईला आल्यावर तो मित्राबरोबर बारमध्ये जातो. तिचा फोटो मित्राला आवडतो. दारू पिऊन दोघं घरी येतात. दाराच्या की-होलमध्ये अडकलेली चावी त्याला काढता येत नाही. ती तशीच ठेवून तो स्विमिंग पूलजवळ बसतो आणि मित्राला ती मुलगी नसून रोबोट असल्याचं सांगतो. मित्र म्हणतो, “तुला कळलं कसं नाही रे ती रोबोट आहे ते.’’ तेव्हा तो म्हणतो, “तिचं दिसणं, तिचा श्वास, तिचा स्पर्श, तिच्या भावना, हावभाव, तिचं मधाळ बोलणं, मला समजून घेणं हे सर्व मानवासारखंच आहे.’’

मित्राच्या सांगण्यावरून तो लग्नाला तयार होतो. त्याचं लग्न ठरतं. लग्नाच्या दिवशी तो पळून जातो. इथे पळून जाताना त्याचे आजोबा जय सिंग (धर्मेंद्र) त्याला मदत करतात. आर्यन मावशीला सिफराला मुंबईत पाठवण्यासाठी सांगतो. त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच असतं. सिफरा मुंबईत एका बॉक्समध्ये येते. तिला तो चार्ज करतो आणि तिला विचारतो, “माझी सगळी माहिती तुला आहे.’’ ती म्हणते, “अशी एक माहिती, जी तुला माहीत नाही, ती मला माहिती आहे, ती म्हणजे तू रात्री झोपेत घोरतोस.’’ तो कबूल करत नाही. हे असले संवाद या चित्रपटाला हलकाफुलका करतात.

आर्यन आणि सिफराचा साखरपुडा झाल्यावर सगळे जण तिला प्रेमाने भरवतात आणि खाता खाता ती बेशुद्ध पडते. तिथे डॉक्टर असतो, तो तिची नस पाहतो आणि सांगतो की, सिफरा मरण पावलेली आहे. आता काय होणार हीच या चित्रपटाची गंमत आहे.

सिफरा रोबोट असल्याचं माहीत असूनही आर्यन तिच्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतो. शेवटच्या अर्ध्या तासात तोच लग्नाचा गोंधळ. मेहंदी, हळद सगळे कार्यक्रम पार पडत असताना अचानक तिच्या प्रोग्राममध्ये बिघाड होतो आणि आधी सांगितलेल्या सूचना ती आता करायला लागते. नवऱयाने टोमॅटो खाल्ला याची कम्प्लेंट करायला ती पोलीस स्टेशनला जाते. लग्नाच्या मंडपाला आग लावते. आर्यनने सिफराला मारल्यानंतर ती बेशुद्ध पडते. तिच्या डोळ्यांतून दोन अश्रू येतात. हे अश्रू दाखवण्यामागे दिग्दर्शकाला नेमकं काय सांगायचं ते कळत नाही. तसंच काही विनोदी प्रसंगही खुलवता आले नाहीत. चित्रपटाच्या शेवटच्या अर्ध्या तासात जो ताण निर्माण व्हायला हवा, जे प्रसंग घडायला हवेत ते दिग्दर्शकाला जमलेलं नाही. चित्रपट दिग्दर्शकाच्या हातातून सुटल्यासारखा वाटतो. त्यामुळे चित्रपटाच्या मजेत बाधा येते. तरीही एक वेगळा विषय म्हणून हा चित्रपट पाहायला हरकत नाही.

शाहीद कपूरचं निरागस बोलणं, त्याचं दिसणं, त्याची बॉडी लँग्वेज… श्रीमंत तरुण मुलांमधला साधेपणा त्याने छान पकडलेला आहे. आपली प्रेयसी रोबोट आहे हे समजल्यानंतर त्याच्यामध्ये येणारी उदासीनता त्याने छान रंगवली आहे. त्याचा धीटपणा, त्याचं सावरणं त्याने आवाजातून छान व्यक्त केलं आहे. क्रिती सेनननेही छान काम केलं आहे. चित्रपटात कुठेही कंटाळा येत नाही. काल्पनिक प्रेमकथा असूनही भरभर पुढे सरकते.

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)