![gbs](https://www.saamana.com/wp-content/uploads/2023/07/gbs--696x447.jpg)
>> डॉ. अविनाश भोंडवे
जानेवारी महिन्याच्या मध्यापासून पुणे परिसरात एका विचित्र आजाराचे रुग्ण सापडू लागले. आठवडाभरात त्यांची संख्या शंभराच्या पुढे गेली. लकवा मारल्यासारखी या रुग्णांच्या पायातली आणि हातातली शक्ती गेली होती, तर काही रुग्णांना श्वास घेणे अशक्य होत होते. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने हा वेगळाच आणि नवा आजार होता, पण पुण्यातील डॉक्टरांनी याचे अचूक निदान करून हा आजार ओळखला. ‘गिलियन बारी सिंड्रोम’ (जीबीएस)नावाचा हा गंभीर, पण दुर्मिळ आजार आणि त्याचे उपचार वैद्यकीय क्षेत्राला गेली अनेक दशके माहीत होते. या आजाराच्या अनेक रुग्णांवर तज्ञ डॉक्टरांनी आजवर यशस्वी उपचारही केले आहेत. त्या जीबीएसविषयी…
काय असतो हा जीबीएस आजार?
‘गिलियन बारी सिंड्रोम’ असा उच्चार असलेला आणि जीबीएस असे संक्षिप्त नामाभिधान असलेला हा एक दुर्मिळ ऑटोइम्युन विकार आहे. ऑटोइम्युन आजारात आपल्याच शरीरातील रोगप्रतिकारक प्रणाली आपल्या परिधीय मज्जातंतूंवर हल्ला करते.
या परिधीय मज्जातंतूंद्वारे स्नायूंच्या हालचालींचे, वेदनांचे, तापमानाचे, स्पर्शाचे संकेत नियंत्रित केले जातात. मज्जातंतूंच्या या कार्यात जीबीएसमुळे बिघाड होऊन काही लक्षणे उद्भवतात. उदाहरणार्थ, हातपाय बधिर होणे, मुंग्या येणे आणि स्नायू कमकुवत होणे. त्यानंतर काही दिवसांत ही लक्षणे वाढून त्याचे अर्धांगवायूमध्ये रूपांतर होते. मात्र वेळेवर योग्य उपचार मिळाल्यास बहुतेक रुग्ण या विकारातून पूर्ण बरे होतात.
हा विकार कोणत्याही वयात होऊ शकतो, परंतु साधारणत 30 ते 50 वर्षे वयोगटातील लोकांमध्ये तो जास्त आढळतो. या दुर्मिळ आजाराचे जगभरात दरवर्षी सुमारे एक लाख लोक आढळतात. लक्षणे आणि कारणे – या आजाराच्या मुख्य लक्षणांमध्ये हातापायांना खूप मुंग्या येणे, हातापायांचे स्नायू कमकुवत होणे, स्नायू दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अर्धांगवायू होणे, एकाचे दोन दिसणे, गिळायला त्रास होणे, मूत्र विसर्जन आणि शौच विसर्जनावरील नियंत्रण जाणे अशा लक्षणांचा समावेश असतो. बहुतेक रुग्णांत याची सुरुवात पायांपासून होते आणि पुढे ते हात आणि चेहऱयापर्यंत पसरतात. पायांमधील स्नायू कमकुवत झाल्याने चालणे किंवा पायऱया चढणे अशक्य होते.
या विकारातल्या गंभीर लक्षणांमध्ये पाठीच्या, पायांच्या स्नायूंमध्ये तीव्र वेदना, हातपाय, चेहऱयाच्या स्नायूंची शक्ती कमी होते. आजार गंभीर झाल्यास पूर्ण शरीर लुळे पडते. छातीचे स्नायू कमजोर होऊन श्वास घेण्यास त्रास होतो. जीबीएस झालेल्या तीनपैकी एका व्यक्तीमध्ये बोलण्यात आणि गिळण्यात अडचण (डिसफेजिया), डोळ्यांची हालचाल न करता येणे आणि एकाचे दोन दिसू लागणे (डिप्लोपिया) असे आढळते. जीबीएसची लक्षणे काही तासांत, काही दिवसांत किंवा आठवडय़ांत वाढू शकतात. कोणाही व्यक्तीला त्याच्या स्नायूंमधील शक्ती अचानकपणे कमी होत चालल्यासारखे वाटले आणि हा त्रास काही तासांत किंवा दिवसांत वाढत गेला तर ताबडतोब इस्पितळात दाखल होऊन जीबीएसचे निदान करून उपचार सुरू करावेत.
आजारातील गुंतागुंत – जीबीएसमध्ये मज्जासंस्थेतल्या ऑटोनॉमिक मज्जातंतूंवर परिणाम झाल्यास प्राणघातक स्वरूपाची गुंतागुंत होऊ शकते. हृदयगती, रक्तदाब आणि पचन अशा स्वयंचलित शारीरिक कार्यांवर ऑटोनॉमिक मज्जासंस्था नियंत्रण ठेवते. शरीरसंस्थेमध्ये उद्भवणाऱया या समस्यांना डिसऑटोनोमिया म्हणतात. डिसऑटोनोमियामुळे होणाऱया गुंतागुंतींमध्ये हृदयाच्या ठोक्यांची लय बिघडणे, रक्तदाब अस्थिर होणे, पचन समस्या (गॅस्ट्रोइन्टेस्टायनल स्टॅसिस). मूत्र विसर्जन करता न आल्याने पोटात लघवी तुंबणे अशी गंभीर लक्षणे उद्भवतात. या परिणामांमुळे जीबीएसच्या 3 ते 10 टक्के रुग्ण मृत्युमुखी पडतात.
कारणमीमांसा – काही मोजक्या व्यक्तींमध्ये संसर्गजन्य आजार होऊन ते बरे झाल्यावर स्वयंप्रतिकार पद्धतीचा जीबीएस हा मज्जासंस्थेचा आजार उद्भवतो. जंतुसंसर्ग – जीबीएस झालेल्या 70 टक्के रुग्णांमध्ये एक ते सहा आठवडय़ांपूर्वी विशिष्ट जंतुसंसर्ग झाल्याचा इतिहास असतो. अशा जंतुसंसर्गानंतर हा ऑटोइम्युन आजार का उद्भवतो, याबाबत वैद्यकीय शास्त्र आज अनभिज्ञ आहे. काही संशोधकांच्या मते, रोगप्रतिकार प्रणालीचा हा विकार रोगप्रतिकारक शक्तीच्या अपेक्षित आणि असामान्य प्रतिसादामुळे उद्भवतो, परंतु बहुतेक स्वयंप्रतिकार आजार आयुष्यभर तसेच राहतात आणि बरे होत नाहीत, परंतु जीबीएस दीर्घकाळ राहतो, पण तो आजीवन नसतो.
न्यूरोपॅथी – जीबीएसमध्ये रुग्णाच्या रोगप्रतिकार प्रणालीच्या हल्ल्यामुळे शरीरामध्ये दाह निर्माण होऊन परिधीय मज्जातंतूंवरचे ‘मायलिन’ नावाचे आवरण नष्ट होते आणि हा विकार उद्भवतो. कोणते संसर्गजन्य आजार धोकादायक अतिसार किंवा श्वसनसंसर्ग ः जीबीएस असलेल्या तीनपैकी दोन रुग्णांमध्ये काही आठवडे आधी उलटय़ा, जुलाब किंवा सर्दी, खोकल्यासारखे श्वसनसंसर्ग झाल्याचे आढळते. या अतिसाराच्या रुग्णांमध्ये कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी या जिवाणूचा (बॅक्टेरिया) संसर्ग सर्वसामान्यपणे आढळतो.
विषाणूजन्य संसर्गः जीबीएस असलेल्या काही लोकांना फ्लू किंवा सायटोमेगॅलव्हायरस, एपस्टाईन-बार विषाणू, झिका विषाणू आणि इतर विषाणूंचा संसर्ग होऊन गेला असल्याचे दिसून येते.
लसीकरण ः अत्यंत दुर्मिळ उदाहरणांत काही लसी घेतल्यानंतर काही दिवसांत किंवा आठवडय़ांत लोकांना जीबीएस होतो. मात्र संशोधनपूर्वक अभ्यासातून सिद्ध झाले आहे की, अशी उदाहरणे खूप अत्यल्प आहेत. लसीकरणाचे फायदे संभाव्य जोखमींपेक्षा खूप जास्त असतात. फ्लूविरोधी लसीकरण केल्यानंतर मिळणारे फायदे हे ती लस घेतल्यानंतर जीबीएस होण्याच्या शक्यतेपेक्षा शतपटीने जास्त असते.
प्रतिबंधक उपाय – जीबीएस आजार होऊ नये यासाठी बाहेरचे उघडय़ावरील अन्न, हातगाडीवरील जंक फूड, कच्च्या भाज्या, न शिजवलेला मांसाहार टाळावा. घरी बनवलेल्या ताज्या, गरम आणि पूर्ण शिजवलेल्या पदार्थांचा आहार घ्यावा. बाहेरील पाणी पिणे टाळावे. थंड पदार्थ, आईक्रीम, थंड पेये, थंड हवा टाळावी. गर्दीच्या ठिकाणे टाळावी. पनीर, भात खाऊ नका अशा अशास्त्राrय प्रचारावर विश्वास ठेवू नका. सर्दी, खोकला, ताप… या गोष्टींसाठी परस्पर औषधे न घेता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
z [email protected]
(लेखक ज्येष्ठ आरोग्यतज्ञ आहेत.)