![parvesh verma](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/parvesh-verma-696x447.jpg)
दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून आम आदमी पार्टीला पराभवाचा सामना करावा लागला. 70 जागांवर झालेल्या निवडणुकीत भाजपने 48 जागा जिंकत बहुमत मिळवले, आपने 22 जागांवर विजय मिळवला. काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. विधानसभा निवडणुकीत ‘आप’च्या अनेक बड्या नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली मतदारसंघात पराभव झाला. भाजपचे परवेश वर्मा हे जायंट किलर ठरले असून त्यांनी केजरीवाल यांचा 4089 मतांनी पराभव केला. याच मतदारसंघातून दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचे सुपुत्र संदीप दीक्षित काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढले होते. त्यांचाही येथून पराभव झाला.
अरविंद केजरीवाल यांचा पराभव करत ‘जायंट किलर’ ठरलेल्या परवेश वर्मा हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत. परवेश वर्मा यांना राजकीय बाळकडू घरातूनच मिळाले. ते भाजपचे ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचे सुपुत्र आहेत. साहिब सिंह वर्मा हे 1996 ते 1998 या काळात दिल्लीचे मुख्यमंत्री होते. परवेश वर्मा यांचे काका आझाद सिंह हे उत्तर दिल्ली महानगरपालिकेचे महापौर होते. तसेच 2013 मध्ये ते भाजपच्या तिकीटावर मुंडका मतदारसंघातून विधानसभा निवडणूकही लढले होते.
परवेश वर्मा यांचा जन्म 1977 मध्ये झाला असून त्यांनी दिल्ली पब्लिक स्कूलमधून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या किरोरी माल कॉलेजमध्ये त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. पुढे त्यांनी एमबीएची पदवी घेतली. 2013 मध्ये ते सक्रिय राजकारणामध्ये उतरले. महरौली विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा विजयी झाले. 2014 मध्ये ते पश्चिम दिल्ली मतदारसंघातून लोकसभेवर गेले आणि 2019 मध्ये त्यांनी साडे पाच लाखांहून अधिक मताधिक्क्याने विजय मिळवला.
2025 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने परवेश वर्मा यांना अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात रिंगणात उतरवले होते. या मतदारसंघातून परवेश वर्मा यांनी केजरीवाल यांचा पराभव केला. उमेवदारी अर्ज दाखल करताना दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे एकूण 90 कोटींची संपत्ती आहे. यात 77.89 कोटींची अचल, तर 12.19 कोटींच्या चल संपत्तीचा समावेश आहे. त्यांच्याकडे टोयोटा इनोव्हा, टोयोटा फॉर्च्यूनर आणि महिंद्र एक्सयूव्ही या तीन गाड्याही आहेत.