हिंदू परंपरेनुसारच मलंगगडावर माघी पौर्णिमेचा उत्सव, 12 फेब्रुवारीला शिवसेनेचे मलंगमुक्ती आंदोलन

 जय मलंग… श्री मलंग, हिंदूंची वहिवाट… हीच मलंगमुक्तीची पहाट अशा जयघोषाने दरवर्षी माघी पौर्णिमेला मलंगगड दुमदुमून जातो. यावर्षीही हाच उत्साह पाहायला मिळणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बुधवारी 12 फेब्रुवारी रोजी मलंगमुक्ती आंदोलन होणार आहे. यादिवशी मच्छिंद्रनाथांच्या समाधीस्थळी वार्षिक स्नान, पालखी, गंधलेपन, नैवेद्य, महाआरती असे सर्व धार्मिक विधी हिंदू परंपरेप्रमाणेच करण्यात येणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.

कल्याण शहरापासून 11 किमी अंतरावर अंबरनाथ तालुक्यात मलंगगड आहे. मलंगगड हे स्थान गोरक्ष रांगेतील देवस्थान आहे. मलंगगडावरील मच्छिंद्रनाथांची समाधी हे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी माघ पौर्णिमेला मलंगबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी असंख्य भाविक येथे येत असतात. मात्र काही वर्षांपासून मलंगगडावर मुस्लिम समाजाने हे स्थान हाजी मलंग असल्याचा दावा केला आहे. याविरुद्ध हिंदू मंचने हरकत घेतल्यानंतर धर्मादय आयुक्तांनी हे सर्वधर्मीय स्थळ असल्याचे मान्य केले. मात्र मुस्लिम समाज वक्फ बोर्डाचा हवाला देऊन हा दर्गा असल्याचे सांगत आहे. यामुळे हे प्रकरण न्यायालयात आहे. असे असले तरी शिवसेनेच्या पुढाकाराने सर्व हिंदू संघटना दरवर्षी माघी पौर्णिमेला गडावर जाऊन हिंदू पद्धतीने उत्सव साजरा करतात. यावर्षीही उत्सव साजरा केला जाणार आहे.

पत्रकार परिषदेला उपनेते अल्ताफ शेख, भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख साईनाथ तारे, जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, धनंजय बोडारे, जिल्हा संघटक तात्या माने, शहरप्रमुख सचिन बासरे, शरद पाटील, अभिजित सावंत, विश्वास स्थळे, बाळ हरदास, जिल्हा संघटक वैशाली राणे, अंजली राऊत, वृंदा कांबळी, विजय काटकर, रवींद्र कपोते, बाळा परब, वंडार कारभारी, दया शेट्टी, भाऊ मात्रे, नीलेश भोर, अभिजित बोले, प्रसन्न कापसे, योगेश पष्टे आदी उपस्थित होते.