कॉपी करताय? सावधान ! ड्रोन भिरभिरणार, ठाणे जिल्ह्यात पहिलाच प्रयोग

drone

दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपी कराल तर सावधान.. तुमच्यावर ड्रोन भिरभिरणार आहे. ठाणे जिल्ह्यात कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे ड्रोनद्वारे शूटिंग करण्यात येणार असून कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना कडक शासनही करण्यात येणार आहे. बोर्डाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त केला असून कॉपी कराल तर क्षणात पकडले जाल, असा इशाराच देण्यात आला आहे.

दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी व बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या परीक्षा ‘कॉपीमुक्त’ पार पाडण्यासाठी बोर्डाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, शिक्षण विभागाच्या अंतर्गत परीक्षा केंद्रावर भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्हा स्तरावरील खातेप्रमुख अचानक परीक्षा केंद्राना भेटी देण्यात येणार आहेत. त्यात आता भर पडली आहे ती परीक्षा केंद्रांवर भिरभिरणाऱ्या ड्रोनची. परीक्षा केंद्रात कॉपीचा वेगवेगळा फंडा शोधून काढणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट शिक्षा केली जाणार आहे.

जिल्ह्यात 535 परीक्षा केंद्र

जिल्ह्यात दहावीकरिता 338 परीक्षा केंद्र असून 1 लाख 3 हजार 718 विद्यार्थी तर बारावीच्या 197 परीक्षा केंद्र असून 1 लाख 21 हजार 244 विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. शिक्षकांवरील ताण कमी व्हावा म्हणून ठाणे जिल्ह्यातील परीक्षा केंद्राचे कामकाज पाहण्यासाठी 20 परिरक्षक नेमण्यात आले आहे.

मोबाईल बंदी

विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर मोबाईल किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे घेऊन जाऊ नयेत असा इशारा देण्यात आला आहे. तसेच केंद्रावर केंद्र संचालक व पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांची डिजिटल माध्यमातून हजेरी घेण्यात येणार आहे.

ही दक्षता घेणार

परीक्षा केंद्रापासून 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच 144 कलम लागू करण्यात येईल.

कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास त्याला मदत करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

परीक्षा केंद्राच्या बाहेरील व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. भरउन्हामध्ये परीक्षेची वेळ असल्याने विद्यार्थी व शिक्षकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाईल.