दोघात तिसरा आणि सगळं विसरा… या वाक्याने अनेक कपल्सची झोप उडते. मूल जन्माला आल्यानंतर, आनंदाचे क्षण असतात. परंतु त्यानंतर मात्र मुलाचा सांभाळ करण्यापासून ते मुलाचं योग्य संगोपन हे असे अनेक प्रश्न पालकांसमोर उभे राहतात.
पालकांची खरी कसोटी असते ती, मूल मोठे झाल्यानंतर त्याला घडवण्याची. मूल घडताना पालक कळत नकळतपणे अनेक चूका करत असतात. तुमच्या पाल्याला घडवताना अनेक गोष्टी विचारात घेणे गरजेचे आहे. यातील पहिली गोष्ट म्हणजे, मुलांमधील आत्मविश्वास… अनेक मुले आत्मविश्वास अभावी मागे राहतात. आत्मविश्वास ही सर्वात पहिली पायरी असते. मुलांमध्ये आत्मविश्वास नसेल तर, मुलं मागे पडतात. म्हणून जाणून घ्या मुलांमधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी या टिप्स..
सर्वात आधी स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा
पालकांनी सर्वात आधी स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. तुम्हाला मुलाची काळजी वाटते हे फक्त तुमच्यापर्यंत मर्यादीत ठेवा. चुकूनही तुम्ही त्याच्याविषयी चिंतेत आहात हे जाणवू देऊ नका. तुम्ही मुलांसमोर आत्मविश्वासाने वागाल तरच तुमच्या मुलांमध्येही तुम्ही आत्मविश्वासाचे बीज रोवू शकाल.
मुलांना त्यांच्या चुका समजावुन सांगा
चारचौघात मुलांना ओरडण्यापेक्षा किंवा मारण्यापेक्षा, त्याने केलेली चूक एकांतात समजावून सांगा. मुलाकडून काय चूक झाली, कशी झाली हे त्याच्यासोबत शांतपणे चर्चा करा. पुन्हा अशी चूक होऊ नये याकरता काय काळजी घ्यायला हवी हे त्याला नीट समजावून सांगा.
मुलांना कायम प्रोत्साहित करा
एखादी नवीन गोष्ट करण्यासाठी मुलांना कायम प्रोत्साहन द्या. नवीन गोष्ट करण्यामागचा तुमचा हेतू मुलांपर्यंत पोहोचवा. नवीन गोष्टी केल्यामुळे, मुलांमध्ये क्रिएटीव्हीटी वाढण्यास मदत होते. त्यामुळेच सतत त्यांना नवीन शिकण्यासाठी तुम्ही आग्रही राहा.
मुलांना नाराज करु नका
एखादी गोष्ट मुलांना जमली नाही तर, त्याला नाराज करु नका. किंवा सर्वांसमोर त्याला ओरडू नका. अशामुळे मुलांना अपमान झाल्यासारखे वाटते. मुलांना नाराज केल्यास, ते पुन्हा ती गोष्ट करण्यास धजावणार नाहीत.
कौतुक करायला शिका
छोट्या गोष्टींसाठी मुलांचे कौतुक करा. कौतुक कुणाला नको असते, अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण कौतुकाचे भुकेले असतात. कौतुक केल्यामुळे मुलांमध्ये एक अनोखा आत्मविश्वास वाढतो. मुलं ही कौतुकाची भुकेली असतात. छोट्या गोष्टींमध्येही त्यांना कुणी आत्मविश्वास दिला तर, मुलांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.
ध्येय निश्चित करा
मुलांना त्यांची ध्येय काय आहेत याची जाणीव करु द्या. म्हणजेच एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी, त्याला काय करायला हवं हे पालकांनी ठरवायला हवं. ध्येय निश्चितीमुळे मुलांना पुढचा प्रवास करणं हे अधिक सोप्पं होतं.
तुमचे प्रेम जाहीरपणे व्यक्त करा
तुम्ही मुलांवर प्रेम करता हे त्यांना दाखवून द्या. तुमच्या मनात त्यांच्याविषयी असलेली आपुलकीची भावना ही मुलांना जाणवून द्या. म्हणजे मुलांमध्ये आपल्यावर कुणीतरी प्रेम करतंय, आपण कुणालातरी हवे आहोत हे रुजण्यास मदत होईल. मुलांमधील आत्मविश्वास वाढीसाठी पालकांची ही कृती खूपच महत्त्वाची ठरेल.