वाल्मीक कराडच्या चाकरीत धन्यता मानणाऱ्या बीड पोलिसांना आता कायदा आणि सुव्यवस्थेचा उमाळा आला आहे. जिल्हाभरातील नामचिन गुंड तसेच माफियांना शुक्रवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावण्यात येऊन त्यांची परेड काढण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी गुंडगिरी कमी न झाल्यास ‘मकोका’ लावण्याचा इशारा दिला.
संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येनंतर बीड जिल्हयातील गुंडगिरीचा विषय ऐरणीवर आला. राखमाफिया, जागामाफिया, वाळूमाफिया, गुटखामाफिया, दारूमाफिया, खंडणीमाफियांनी बीडचा बिहारच केला आहे. दररोज हाणामाऱ्या, रक्तपात ठरलेलेच आहे.
पोलिसांनी कारवाई करायची ठरवली तरी त्यात आडकाठी घालण्यासाठी गल्लीबोळातून पुढारी उगवतात. अनेक जणांवर दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. आज जिल्हाभरातील पोलीस ठाण्यांमधील जवळपास 80 जणांना पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी बोलावून घेतले. गुंडगिरी थांबली नाही तर एमपीडीए, हद्दपारी, मकोका लावण्याचा इशारा त्यांनी गुंडांना दिला.
पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी बीड जिल्हयातील गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. परंतु पोलीस दलात असलेल्या कराडप्रेमींमुळे त्यात अडथळे येत आहेत. या कराडप्रेमींना हटवण्यात आले तर गुन्हेगारीला नक्की आळा बसेल, अशी बीडकरांना आशा आहे.
अशोक मोहिते हल्ला प्रकरण, वैजनाथ बांगरला पोलीस अभिषेक सानप बालसुधारगृहात
‘वाल्मीक कराडच्या बातम्या का बघतोस?’ असे म्हणून अशोक मोहितेवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या वैजनाथ बांगर याची न्यायालयाने पाच दिवसांसाठी पोलीस केली. तर अभिषेक कोठडीत रवानगी सानप हा अल्पवयीन असल्यामुळे त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले. या दोघांनाही काल कर्नाटकातून ताब्यात घेण्यात आले होते.
अशोक मोहिते याला काल मोबाईलवर वाल्मीक कराडशी संबंधित बातम्या पाहत असताना संतोष देशमुख हत्या प्रकरणात ‘वॉन्टेड’ असलेल्या कृष्णा आंधळेचे मित्र असलेल्या वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानपने बेदम मारहाण केली होती. ‘तुझाही संतोष देशमुख करू!’ अशी धमकीही या दोघांनी दिली होती. हल्ल्यात गंभीर झालेल्या अशोकवर सध्या लातुरात उपचार सुरू कोठडी, आहेत. हल्ला करून फरार झालेल्या वैजनाथ आणि अभिषेक या दोघांच्या पोलिसांनी काही तासांतच मुसक्या आवळल्या. कर्नाटकातून या दोघांना जेरबंद करण्यात आले. वैजनाथ आणि अभिषेकला आज धारूर न्यायालयासमोर उभे करण्यात आले. न्यायालयाने वैजनाथ बांगर याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, तर अभिषेक हा अल्पवयीन असल्यामुळे त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.
• वैजनाथ आणि अभिषेक हे दोघेही कृष्णा आंधळेचे जिवलग मित्र आहेत. कृष्णा आंधळे फरार झाल्यानंतर त्याचा ठावठिकाणा कर्नाटकात असल्याची माहिती होती. हे दोघेही कर्नाटकातच पोलिसांच्या हाती लागले. त्यामुळे कृष्णा हा कर्नाटकातच असावा, असा दाट संशय व्यक्त होत आहे.