अजिंठा अर्बन बँकेत 97 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार सुभाष झांबडला सहा दिवसांची पोलीस कोठडी

अजिंठा अर्बन बँकेतील 97 कोटी 41 लाखांच्या घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचा माजी आमदार सुभाष झांबड याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो पसार होऊन अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात प्रयत्न करत होता. जामिनासाठीचे प्रयत्न अपयशी ठरल्याने अखेर आज शुक्रवारी सकाळी त्याने पोलिसांसमोर शरणागती पत्करली. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी झांबडला अटक करून जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. बी. तोष्णीवाल यांच्यासमोर हजर केले असता त्यांनी आरोपी झांबडला 12 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

अजिंठा अर्बन बँकेच्या संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्जदारांना विनातारण कर्ज दिले. तसेच खोट्या व बनावट नोंदी घेऊन खोटा हिशेब तयार करून 97.41 कोटी रुपयांचा अपहार केल्याची तक्रार प्रशासक सहकारी संस्थेचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक सुरेश पंडितराव काकडे (53, रा. कासलीवाल मार्बल, बीड बायपास) यांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घोटाळ्याशी संबंधित 14 आरोपींना पोलिसांनी आतापर्यंत बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात 4 हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या घोटाळ्यात 36 एफडी अगेन्स्ट कर्ज प्रकरणाच्या फाईलपैकी 31 कर्ज प्रकरणांच्या फायली तसेच आरोपीने तयार केलेले खोटे व बनावट बँकेचे मूळ बॅलेन्स प्रमाणपत्र तपासात जप्त करण्यात आले असून, उर्वरित 5 कर्ज प्रकरणांच्या फायली मिळाल्या नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

एफडी विड्रॉव्हल करून कर्ज खात्यावर केला भरणा

ठेवीदारांच्या संमतीशिवाय 21 कोटी रुपयांच्या एफडी विड्रॉव्हल करून एफडी अगेन्स्ट कर्ज खात्यावर भरणा करून कर्ज खाते निरंक केल्याचा प्रकार प्रशासकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यांनी 28 फेब्रुवारी 2024 रोजी दिलेल्या पत्रानुसार, एफडीओडी कर्ज खात्यात 21 कोटी 56 लाख 11 हजार 565 रुपये जमा करून कर्ज खात्यात जमा करण्यात आल्या. तसेच 18 ऑक्टोबर 2023 रोजी थकीत कर्ज खात्यावर 24 कोटी 93 लाख 16 हजार 670 रुपये व आरटीजीएसद्वारे 18 कोटी 76 लाख 41 हजार 588 रुपये असे एकूण 65 कोटी 25 लाख 69 हजार 823 रुपये एफडीओडी थकीत कर्ज खात्यामध्ये भरणा केल्याचे समोर आल्याचे प्रशासकांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

अपहारातील पैशांचे काय केले याच्या तपासासाठी कोठडी आवश्यक

आरोपी झांबडला गुन्हे शाखेच्या पथकाने आज दुपारी न्यायालयात हजर केले. पोलिसांनी घोटाळ्यातील बनावट एफडींच्या 36 फायलींपैकी 31 फायली जप्त केल्या आहेत. उर्वरित पाच कर्ज फाईल हस्तगत करायच्या आहेत. त्या 36 कर्जदारांपैकी 6 कर्जदारांची नावे निष्पन्न झाले असून, 30 कर्जदारांची नावे निष्पन्न करून त्यांना अटक करण्यासाठी झांबडच्या पोलीस कोठडीची मागणी सहायक लोकाभियोक्ता बी.आर. लोया यांनी न्यायालयाकडे केली. तसेच 36 एफडींची अगेन्स्ट कर्जाची रक्कम आरोपीच्या सोहम मोटर्स व झांबड कन्स्ट्रक्शन बँक खात्यावर जमा झालेली असून, तेथून ती रक्कम विड्रॉव्हल करण्यात आली. त्यामुळे आरोपीने त्या रकमेचा उपयोग कोठे केला, याचा तपास करायचा आहे. तसेच बनावट बँक बॅलेन्स प्रमाणपत्रावर बँकेचे शिक्के कोणी व कोठे तयार केले, याचा तपास करण्यासाठी कोठडीची गरज असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.