खाऊगल्ली- ठाणे तिथे मराठी खाणे

>> संजीव साबडे

डाळिंबी उसळ, पिठलं भात, झुणका, ज्वारी, बाजरी, तांदूळ व नाचणीची भाकरी, तिखट झणझणीत खर्डा, वांग्याचं भरीत, अंबाडी, चुका, लाल माठ वा चाकवत अशा पालेभाज्या, आमटी… शिवाय जेवण झाल्यावर मस्त दुधी हलवा मिळाला तर चैनच की! असं अस्सल मराठमोळं जेवण किंवा मेजवानी मिळणारी असंख्य रेस्टॉरंट आणि पोळीभाजी केंद्रे ठाण्यात आहेत. म्हणूनच ठाणे तिथे मराठी खाणे असे म्हटले जाते ते उगाच नाही.

कधी कधी घरी जेवायचा किंवा स्वयंपाक करण्याचा कंटाळा येतो. बाहेर जाऊन जेवू अशी इच्छा असते. शाकाहारी आणि अगदी साधं व कमी खर्चिक जेवणच हवं असतं. किंवा कामासाठी बाहेर पडलं असताना असं जेवावंसं वाटतं. शाकाहारी म्हणजे छोले भटुरे, पनीर पसंदा, मिक्स व्हेजिटेबल, आलू मटार असलं नको असतं. अस्सल मराठमोळं जेवण हवं असतं. मराठी नाश्ता मिळणारी असंख्य रेस्टॉरंट आणि पोळीभाजी केंद्रे मुंबई व ठाण्यात आहेत. अगदी उपवासाचे खिचडी, साबुदाणा वडा, फराळी मिसळ वगैरे पदार्थही अनेक ठिकाणी असतात. पण अस्सल महाराष्ट्रीयन आणि आजही ग्रामीण भागात मिळू शकणारं जेवण म्हणजे डाळिंबी उसळ, पिठलं भात, झुणका, ज्वारी, बाजरी, तांदूळ व नाचणीची भाकरी, तिखट झणझणीत खर्डा, वांग्याचं भरीत, अंबाडी, चुका, लाल माठ वा चाकवत अशा पालेभाज्या, आमटी (दाल फ्राय नव्हे!) वगैरे. शिवाय जेवण झाल्यावर मस्त दुधी हलवा मिळाला तर चैनच की!

मुंबईत हे पदार्थ मिळतात का, कुठे मिळतात, असा शोध स्रू करावा लागतो. मग लक्षात येतं, हे पदार्थ मिळणारी रेस्टॉरंट्स ठाण्यात अधिक आहेत. मुंबईतही आहेत, ती प्रामुख्याने गिरगाव, दादर, विलेपार्ले भागातच. अन्यत्र खात्री कमी. पुण्याच्या कोथरुड भागात `चला बसू या’ नावाचं एक रेस्टॉरंट आहे. तिथे बार आणि अमराठी सारे खाद्यपदार्थ आहेत. (मुंबईतही या नावाच्या रेस्टॉरंटचा बोर्ड अलीकडेच माटुंग्याला पाहिला. असो.) पण जेवणामध्ये वरण भात व तूपही मिळतं. तसं वरण भात तूप, मेतकूट, चित्रान्न हे तसंच वऱहाडी, सोलापुरी, कोकणी, मराठवाडी, खान्देशी प्रकार ठाण्यातील रेस्टॉरंटमध्ये मिळणं सोपं आहे. म्हणजे ठाणे तिथे मराठी खाणे. पुण्याच्या असंख्य रेस्टॉरंटमध्ये मराठी पदार्थ मिळतात. फोडणीची पोळीही मिळते, तर ठाण्यात एका रेस्टॉरंटमध्ये फोडणीचा पाव ही डिश आहे. पाव वा ब्रेडचे छोटे तुकडे करून त्याला कांदा, टोमॅटो व तिखट मिठाची फोडणी घालून केलेला पदार्थही छान. पूर्वी अनेक घरी रात्रीची पोळ्या-चपात्या वा फुलके शिल्लक राहिल्यास फोडणीची पोळी वा पोळीचा गूळ, तूप घालून लाडू केले जात. पोळीचे लाडू मात्र कुठेच मेन्यूमध्ये दिसलेला नाही.

ठाण्यात भगवती शाळेच्या थोडंसं पुढे `राज स्नॅक्स’ नावाचं ठिकाण आहे. प्रशांत ठोसर व त्यांची पत्नी 10-15 वर्षांपासून ते चालवतात. ते रेस्टॉरंट नाही. पोळीभजी केंद्र आहे. पण चार जण तिथल्या खुर्च्यावर बसून जेवू शकतात. तिथे पोळ्या तर असतातच, पण ज्वारी, बाजरी, नाचणी व तांदळाच्या भाकरी असतात. बाजरीची भाकरी अर्थातच थंडीत. चाकवत, मेथी, चवळी, लाल माठ अशी रोज एक मराठी पद्धतीची पालेभाजी असते तिथं. शिवाय मिरची, चिंच, गूळ घातलेलं वांग्याचं भरीत. जळगावी वा खान्देशी पांढऱया वांग्याचं भरीत आणि गरम मसाल्याचं तिखट असतं जेवणात. शिवाय डाळिंबी उसळ मिळते. झुणका तर असतोच, पण पिठलं भातही मिळतो त्या केंद्रात. बटाटय़ाचा कीसही असतो. कधी कधी दह्याची कढी असते आणि बासुंदी व दुधी हलवाही मिळतो तिथे. तेथील चिरोटे खूप प्रसिद्ध आहेत.

ठाण्यात `मेतकूट’ नावाचं रेस्टॉरंट आहे नौपाडय़ात. तिथेही भरीत, भरली वांगी, शहाळ्याची तसंच फणसाची भाजी, काजूची उसळ, मेथीची भाजी, टोमॅटोचं सार, आंबोळ्या व काळ्या वाटाण्याची उसळ वा सांबार, रस्सा भाजी, भाकरी, घडीच्या पोळ्या, चिंच गुळाची आमटी, साधं वरण असं मराठी जेवण मिळतं. सकाळी व संध्याकाळी मराठी नाश्ताही असतोच. या रेस्टॉरंटच्या नावातच मेतकूट आहे. पण मेन्यूमध्ये मेतकूट भात दिसला नाही. वरून तूप घातलेला मेतकूट भात किंवा मेतकूटमध्ये तिखट व दही आणि भाकरीसह मेतकूट, गोडा मसाला आणि वरून तेल आणि सोबतीला कांदा हे खासच. छान आहे हे ठिकाण.

घोडबंदर, मानपाडा भागातील पूर्णब्रह्म रेस्टॉरंटमध्ये महालक्ष्मी थाळी, दत्तगुरू थाळी, बालाजी थाळी, गजानन महाराज थाळी, वऱहाडी थाळी पुरणकूट थाळी असे आगळे प्रकार आहेत. पाटवडय़ा व मासवडय़ा रस्सा हे इथलं वैशिष्टय़ म्हणता येईल. इथे दाक्षिणात्य वा पंजाबी पदार्थ नाही ठेवत. याच ठाण्यात विवियाना मॉलसमोर सर्व्हिस रोडवर आणखी एक मस्त ठिकाण आहे. ते म्हणजे `खवय्ये!’ तिथे साधं पिठलं, शेवग्याच्या शेंगा घातलेलं पिठलं, कुळथाचं पिठलं, झुणका, आंबोळ्या, घावणे, मालवणी वडे, काळ्या वाटाण्याची उसळ, डाळिंबी उसळ, पालेभाजी अशी खवय्येगिरी उपलब्ध आहे. हो, इथे दडपे पोहेही मिळतात. जवळच महापालिका मार्गावर कचराळी तलावापाशी `श्रावण’ नावाचं शाकाहारी मस्त ठिकाण आहे. तिथेही भरली वांगी, पिठलं, काजूची तसंच डाळिंबी उसळ, फणसाची भाजी, मेथीची बेसन पीठ पेरून भाजी असे अनेक प्रकार आहेत. बेसन घालून मेथीची भाजी फारच मस्त लागते. शिवाय खिचडी कढी, वरण-भात-तूप हे सर्व पदार्थ आहेतच. पण `श्रावण’चं वैशिष्टय़ म्हणजे खास सोलापुरी बाजार आमटी आणि वरणफळंही जेवणात मिळू शकतात. वरणफळं आणि बाजार आमटी मिळणारी अशी आणखी ठिकाणं नसावीत.

सोलापुरी किंवा पंढरपुरी बाजार आमटी ठाण्याच्या बी केबिन परिसरातील `शिदोरी’ रेस्टॉरंटमध्येही मिळते. त्याशिवाय शिदोरीची खासियत म्हणजे तेथील कटाची आमटी. हल्ली कटाची आमटी घरातही क्वचित केली जाते, तीही पुरणपोळी केली तरच. या शिदोरीमध्ये डाळिंबी उसळ, झुणका याबरोबर मासवडी, गोळ्याची कढी, वरण भात, दही भात, चित्रान्न अशीही मेजवानी असते. चित्रान्न हा प्रकार मुंबई वा ठाण्यात आणखी कुठे मिळत असेल असं वाटत नाही.

मराठी जेवण झाल्यावर गोडधोड प्रकारही मराठीच हवा. यातील बहुसंख्य रेस्टॉरंटमध्ये उकडीचे मोदक वा दुधी हलवा मिळतो, काही ठिकाणी मराठी पद्धतीने बनवलेला गाजर हलवाही असतो. पुरणपोळी घर नावाचं मस्त ठिकाण आहे नौपाडय़ात. तिथे शुगरफ्रीसह जवळपास 18 प्रकारच्या पुरणपोळ्या मिळतात आणि मोदकही. हे ठिकाण विसरायचं नाही. मल्हार सिनेमापाशी दीक्षित यांच्या अवनी गृहउद्योगमध्ये तब्बल 11 चवीचे खरवस मिळतात. अशी मेजवानी मुंबईत अशक्य. त्यामुळे ठाणे तिथे मराठी खाणे!!

z saहरान्saंadा1@gस्aग्त्.म्दस्