कथा एका चवीची- चॉकलेटी दिवस…

>> रश्मी वारंग

जगभरात व्हॅलेंटाईनडेच्या निमित्ताने चॉकलेटचे अनेकविध प्रकार आढळून येतात. त्यातही प्रत्येक देशाची आपली खासियत निराळी आहे. याच रोमँटिक व्हॅलेंटाईन स्पेशल चॉकलेटची ही गोड गुलाबी कहाणी.

प्रेमभावना व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत. गुलाबाची फुलं, गुलाबी पत्रं ‘हाल ए दिल’ सांगतात. पण हृदयाचा मार्ग पोटातून जातो या म्हणीनुसार आपलं प्रेम व्यक्त करण्याचा चविष्ट मार्ग म्हणजे खवय्येगिरी. ‘व्हॅलेंटाईन डे’ आणि चॉकलेट यांचं अतूट नातं आहे. जगभरात व्हॅलेंटाईनडेच्या निमित्ताने चॉकलेटचे अनेकविध प्रकार आढळून येतात. त्यातही प्रत्येक देशाची आपली खासियत निराळी आहे. याच रोमँटिक व्हॅलेंटाईन स्पेशल चॉकलेटची ही गोड गुलाबी कहाणी.

चॉकलेटचा इतिहास 4000 वर्षं जुना आहे. चॉकलेट ज्या काकाओ वृक्षाच्या बियांपासून बनतं ते झाड, या झाडाला पवित्र मानत. या संस्कृतीत काकाओला देवतांचं अन्न मानलं जाई. कोकोच्या पाच  बिया वधू-वर एकमेकांना जीवनसाथी निवडल्याची साक्ष म्हणून देत. चॉकलेटचं आताच्या व्हॅलेंटाईन डेशी जुळलेलं नातं या परंपरेत आहे.

तर अशा कोको बियांपासून चॉकलेट बनवण्याची कला अवगत झाल्यावर विविध संस्कृतीत त्यात खूप सारे बदल आणि प्रयोग झाल्याचं दिसतं. बेल्जियम चॉकलेटचा जगभरात प्रचंड गवगवा आहे. त्यातही बेल्जियम बॉनबॉन भाव खाऊन जातं. आपणही अनेकदा हे चॉकलेट खाल्लेलं असतं, पण ते बेल्जियम चॉकलेट आहे हे आपल्याला माहीत नसतं. बॉनबॉन म्हणजे छोटय़ा वेगवेगळ्या आकाराच्या साच्यामध्ये बनवलेलं चॉकलेट. याच्या मध्यभागी काहीतरी भन्नाट आणि वेगळंच दडलेलं असतं. कधी जेली किंवा बदाम, पिस्ते किंवा अन्य हटके गोष्टी या चॉकलेटच्या आत भरलेल्या असतात. हे बेल्जियम बॉनबॉन आज विविध कारणांनी भेटवस्तू म्हणून दिलं-घेतलं जातं.

जपानमध्ये चॉकलेटची परंपरा व्हॅलेंटाईन डेशी जोडताना त्यात दोन प्रकार दिसतात. एक म्हणजे गिरी चोको. प्रत्येक स्त्राr ओळखीच्या प्रत्येक पुरुषाला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हे गिरी चोको चॉकलेट देते, तर होनमेई चोको हे चॉकलेट फक्त अगदी खास आणि जवळच्या व्यक्तीलाच दिले जाते. जपानमध्ये 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेला स्त्रिया पुरुषांना गिफ्ट देतात. आणि 14 मार्चला पुरुष त्या गिफ्टची परतफेड वेगळ्या भेटवस्तूने करतात. या परंपरेला चॉकलेटची साथ असतेच.

मेक्सिकन चॉकलेटमध्ये चक्क दालचिनी आणि मिरची यांचा खुबीने वापर केला जातो. दुबईसारख्या वाळवंटी भागामध्ये चॉकलेटचे अनेकविध वैविध्य आढळणं तसं दुर्मिळच. पण इथला दुबई चॉकलेट बार कोरोनानंतरच्या काळात जगभरात प्रसिद्ध झाला. हा बार म्हणजे चॉकलेटच्या आतमध्ये भरलेले पिस्त्याचे सारण. एका टिकटॉकरने हे चॉकलेट खातानाचा व्हिडीओ टाकला आणि दुबई चॉकलेट बार जगभरातल्या खवय्यांना माहिती झाला.

जगभरात अशी अनेक वैविध्यपूर्ण चॉकलेट्स आढळतात जी त्या-त्या देशाच्या संस्कृतीचा मागोवा घेतात. अलीकडच्या काळात चॉकलेटचा संबंध हा रोमान्सशी जोडला गेला आहे. बेल्जियमच्या हसल्ट विद्यापीठात एक संशोधन झालं. एका पुस्तकाच्या दुकानात चॉकलेट गंध सोडण्यात आला. त्यानंतर पुस्तकांच्या त्यातही रोमॅण्टिक पुस्तकांच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली. पुस्तक आणि रोमांस यांचं नातं इथे पुन्हा एकदा नव्याने सिद्ध होतं.

येणाऱया व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने तयारी करताना अशी अनेक चॉकलेट्स विकत घेतली जातील. चॉकलेट प्रेमाची वेगळी परिभाषा मांडतात. एक चॉकलेट अर्ध-अर्ध खाणं म्हणजे या प्रेमाची परिपूर्ती.

तोंडात घोळणारं चॉकलेट नात्यांमध्येही कडूगोडपणाचा स्वाद मिसळतं हे नक्की.

 (लेखिका आरजे व स्तंभलेखिका आहेत.)