![steve smith](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/steve-smith-696x447.jpg)
पहिल्या कसोटीत श्रीलंकेला धूळ चारल्यानंतर दुसऱ्या कसोटीतदेखील लंकेला लोळवण्यासाठी ऑस्ट्रेलिया पुन्हा सज्ज झाली आहे. दुसऱया कसोटीत लंकेचा डाव 257 धावांत गुंडाळल्यानंतर स्टिव्ह स्मिथ आणि अॅलेक्स पॅरी यांच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया 330 धावा करून पहिल्या डावाची दणक्यात सुरुवात केली आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱया लंकेचा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांपुढे निभाव लागला नाही. कुसल मेंडीसने केलेल्या 85 आणि दिनेश चंडीमलच्या 74 धावांच्या जोरावर लंकेला 257 धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क, कुहनेमन आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी तीन विकेट टिपले.
ऑस्ट्रेलियाच्या डावाचीही सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्या सामन्यातील द्विशतकवीर उस्मान ख्वाजा 36 धावा करून तंबूत परतला. हेडदेखील 21 आणि लाबुशन अवघ्या 4 धावा करून माघारी परतला, मात्र त्यानंतर स्मिथ आणि पॅरी यांनी डावाला आकार दिला. स्मिथने 239 चेंडूंत 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 120, तर पॅरीने 156 चेंडूंत 13 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 139 धावा कुटल्या.
रोहितची धावांची कटकट कटकला मिटणार? बाराबती स्टेडियमवर अर्धशतकाच्या हॅटट्रिकची संधी
स्मिथचे 36 वे ऐतिहासिक शतक
स्मिथने सलग दुसऱया सामन्यातही शतकी खेळी करून इतिहासाला गवसणी घातली. या शतकासह स्मिथ जो रूट आणि राहुल द्रविड यांच्या पंगतीत जाऊन बसला आहे. स्मिथ आता कसोटी क्रिकेटमध्ये 36 शतके ठोकणाऱया फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. सर्वात विशेष म्हणजे स्मिथने गेल्या पाच कसोटी सामन्यांत चौथे शतक झळकावले आहे. आता स्मिथच्या पुढे सचिन, पॅलिस, पॉण्टिंग आणि संगक्कारा हे चारच फलंदाज आहेत.