![rohit sharma](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/rohit-sharma-696x447.jpg)
कसोटीतील सातत्यपूर्ण अपयशामुळे आधीच निवृत्तीच्या उंबरठय़ावर रेंगाळत असलेल्या रोहित शर्माकडून साऱ्यांनाच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत घणाघाती फलंदाजीची अपेक्षा आहे. त्यातच नागपूर सामन्यात त्याने 2 धावा केल्यामुळे साऱ्यांचा घोर अपेक्षाभंग झाला आहे. परिणामतः त्याच्याविषयी पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे ‘खेलो या झेलो’ या निर्णयापर्यंत पोहोचलेला रोहित कटकला आपल्या धावांची कटकट संपवण्याची शक्यता आहे. कटकच्या बाराबती स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या गेल्या दोन्ही सामन्यांत त्याने 72 आणि 63 धावांची आक्रमक खेळी केली होती. रविवारीही त्याच्या बॅटमधून अशीच फटकेबाजी पाहायला मिळेल, असा चाहत्यांना विश्वास आहे.
ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत 1-3 ने हार सहन केल्यानंतर रोहितच्या निवृत्तीची मागणी जोर धरू लागली होती. तूर्तास ही मागणी लांबणीवर पडली आहे. मात्र आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या परीक्षेसाठी इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात रोहित पुन्हा अपयशी ठरल्यामुळे त्याच्यावर निवृत्ती रॉकेट सोडण्यात आले आहे. त्याचबरोबर या मालिकेत त्याच्या बॅटमधून धावांची फटकेबाजी न झाल्यास पुन्हा एकदा नव्या कर्णधारपदाचा शोध सुरू होईल आणि त्यात हार्दिक पंडय़ा आणि शुभमन गिलचे नाव सर्वात पुढे मानले जात आहे.
टी-20 वर्ल्ड कप जिंकून रोहित शर्माने या वेगवान खेळातून निवृत्ती पत्करली, पण त्यानंतर त्याच्या जागी हार्दिक पंडय़ाची वर्णी न लावता सूर्यकुमार यादवला टी-20 क्रिकेटचे कर्णधारपद सोपवण्यात आले. मात्र आता रोहितसह सूर्याचे अपयश हार्दिकच्या पथ्यावर पडण्याची शक्यता बळावली आहे.
वन डे मालिकेनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीतही रोहितचा धमाका न दिसल्यास निवड समितीला नव्या कर्णधाराची निवड करावीच लागणार आहे. यात तूर्तास गिलपेक्षा हार्दिक पंडय़ाचे नाव आघाडीवर मानले जातेय. या घडामोडींना थांबवण्यासाठी रोहितकडे आपल्या फलंदाजीशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. हिंदुस्थानने मालिका जिंकली तरी रोहितच्या बॅटमधून किती धावा निघाल्या? याचा हिशेब मांडण्याची वेळ आल्यामुळे मुंबईच्या राजाला आपला खेळ दाखवावाच लागणार आहे. त्यामुळे कटकचे बाराबती रोहितच्या फलंदाजीच्या झंझावातासाठी योग्य मानले जातेय. आपल्या मागे लागलेली धावांची आणि निवृत्तीची कटकट संपवण्याच्या ध्येयानेच रोहित रविवारी मैदानात उतरणार याबाबत तीळमात्र शंका नाही. मात्र रोहितची बॅट कुणाचे ध्येय साकारते आणि कुणाचे मनसुबे उद्ध्वस्त करते ते बाराबतीवर अवघ्या हिंदुस्थानला दिसेलच.