शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोडाफोडीच्या अफवा पसरवणाऱ्या मिंधे गटाला आज आक्रमक प्रत्युत्तर दिले. अरे, हिंमत असेल तर फोडून दाखवा. आता शिवसैनिकांच्या संयमाचा अंत पाहू नका. फोडाफोडी करायला लागलात तर कधी तुमचे डोके फुटेल ते कळणार नाही, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या ‘शिवबंधन’ या कार्य अहवालाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झाले. जमलेल्या माझ्या कडवट निष्ठावंत शिवसैनिक बांधवांनो आणि भगिनींनो… अशी सुरुवात उद्धव ठाकरे यांनी करताच सभागृह शिवसेनेच्या जयघोषाने आणि गद्दारांच्या निषेधाने दुमदुमले. कितीही कुणी फोडाफोडी केली तरी अस्सल शिवसैनिक आहे त्या तटबंदीला चरासुद्धा पडलेला नाही, असा अभिमान उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
फोडाफोडी करायची असेल तर सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा, पोलीसबिलीस बाजूला ठेवा, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय बाजूला ठेवा आणि हिंमत असेल, मर्दाची अवलाद असाल तर शिवसेनेचा एक तरी शिवसैनिक फोडून दाखवा, असे जाहीर आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिले. पैशाची आमिषे दाखवायची, अटकेची भीती दाखवायची, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयची भीती दाखवायची… अरे कसले तुम्ही मर्द… नामर्दाची अवलाद, नकली बापाची अवलाद आहात, कारण हिंमतच नाही, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
रुपयाही डुबतोय त्याकडेही मोदींचे लक्ष असलेले बरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभात केलेल्या गंगास्नानावरूनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी टीका केली. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी बुलेटप्रूफ जॅकेट घालून गंगास्नान केले असे म्हणतात. मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा ते रेनकोट घालून आंघोळ करतात असे मोदी म्हणाले होते. भाविकांच्या श्रद्धेला मी तडाखा मारत नाही, पण गंगेत डुबकी मारताना आपला रुपयाही डुबतोय त्याकडेही मोदींचे लक्ष असलेले बरे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
सगळेच भाजपचे गुलाम होणार नाहीत, याद राखा
कथित घोटाळय़ाच्या आरोपाखाली वर्षभर तुरुंगात राहिल्यानंतर नुकतीच सुटका झालेले शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांचाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी आवर्जुन उल्लेख केला. ‘सूरज चव्हाण साधा शिवसैनिक. काय दिले त्याला आपण? म्हटले असे तर तो झुकला असता. भाजपकडे जाऊ शकला असता. मिंध्यांकडेही गेला असता. पण दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आता जे दिल्लीत बसलेत त्यांना हे माहीत नाही की, त्यांचे तख्त महाराष्ट्र राखतो आणि महाराष्ट्रावर जुलूम केलात तर ‘दिल्लीचेही तख्त पह्डतो महाराष्ट्र माझा’ ही नवीन ओळ महाराष्ट्र गीतामध्ये लिहावी लागेल,’ असा भीमटोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. सगळेच तुमचे गुलाम होणार नाहीत, ते महाराष्ट्राच्या रक्तात नाही, असेही त्यांनी भाजपला उद्देशून ठणकावले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पक्षाच्या बहुमताचे ढोंग फाडून टाकले. कारण महाविकास आघाडीचा पराभव कुणालाच पटलेला नाही. तसाच महायुतीला विजयही पटलेला नाही. कारण बहुमत मिळूनही मुख्यमंत्री कोण हे ठरवायला त्यांना एक महिना लागला. तुझा वाटा किती, माझा वाटा किती. पालकमंत्रीपदे अजून ठरत नाहीत. ही खेचाखेची करणे याला तुम्ही बाळासाहेबांचे विचार मानता? असा बोचरा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
92-93 मध्ये जातीय दंगलीत शिवसैनिकांनी मुंबई वाचवली, मग मराठी माणूस हा हिंदू नाही का? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेने हिंदुत्व सोडले म्हणणाऱयांचा समाचार घेतला. मराठी माणसाला कुणी हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. हे मी वारंवार सांगतोय. कारण भाजपकडून ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्या तोडायला हे सांगावेच लागेल, असे ते म्हणाले.
शिवबंधनधारी शिवसैनिक कधीच इकडेतिकडे जाऊ शकत नाही
अंबादास दानवे यांच्या ‘शिवबंधन’ कार्य अहवालाची प्रशंसा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. अहवालाच्या मुखपृष्ठावर दानवे यांच्या शिवबंधन बांधलेल्या हाताचे चित्र आहे. त्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवबंधन ज्याच्या हाती तो शिवसैनिक कधीच इकडेतिकडे जाऊ शकत नाही. लढण्यासाठी तलवार लागते, तलवार पकडायला मजबूत मनगट लागते आणि त्याहीपेक्षा ती पकडायला मन लागते. नाहीतर तलवार आहे, पण चालवण्याची हिंमत होत नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेशी गद्दारी करणाऱयांवर निशाणा साधला. ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली त्यांची मने मेली आहेत, फक्त गट राहिलेत. आपण तलवार कुणावर चालवत आहोत हेच त्यांना कळत नाही. अशा वेळी शिवसेनेसोबत राहिलेल्या शिवसैनिकांचे काwतुक करावेच लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेना असेपर्यंत भाजपला मुंबई गिळायला देणार नाही
धारावी पुनर्विकासासाठी अदानी आणखी जमीन मागत आहेत. याविरोधात लढणार कोण म्हणून ते शिवसेनेच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न करत आहेत. पण शिवसेना भाजपला मुंबई गिळायला देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी निक्षून सांगितले. मुंबई गिळायची आहे म्हणून मला एकटा पाडण्याचा प्रयत्न होतोय, असेही ते म्हणाले. महापालिका रुग्णालयांचे खासगीकरण करायला चालले आहेत. उद्या महापालिकाही अदानीला देतील. मग मुख्यालयात काय अदानी बसणार तिथे? म्हणून शिवबंधन हृदयात हवे आणि ते मातीशी बंधन असावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपने बोगस मतदार घुसवले
एकूण पाच वर्षांत 32 लाख आणि पाच महिन्यात 40 लाख मतदार वाढले. मग हे मतदार आले कुठून? भाजपने बोगस पद्धतीने मतदार घुसवलेत, हे इतर राज्यांतून आले आहेत, असे सांगताना, मतदारयादीत अचानक घुसलेला माणूस कोण आहे यावर लक्ष ठेवणे हे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आता जे घुसलेत त्यांना सहजासहजी वळगता येणार नाही, त्यासाठी मोठा अभ्यास आणि संघर्ष करावा लागेल असेही ते म्हणाले. लोकशाहीची हत्या म्हणतात ती हीच आहे, असे ते म्हमाले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांच्या भेटीची आठवण यावेळी सांगितली. फार वर्षांपूर्वी टी.एन. शेषन यांची मंत्रालयात भेट झाली. चहापानासाठी बसलो तेव्हा बाळासाहेब म्हणाले, त्यांना मुद्दामहून विचार की, आपल्या देशात बांगलादेशी कसे मतदान करू शकतो. त्यांनी बघितले आणि म्हणाले की, तू त्यांना रेशनकार्ड द्यायचे बंद कर. मी म्हणजे सरकार. नाहीतर हे वाक्य तोडून भाजपवाले फिरवतील…बिनबापाचे. असे उद्धव ठाकरे म्हणताच सभागृहात हशा पिकला.
काहींना शिवबंधन बांधण्यासाठी मनगटे भाडय़ाने घ्यावी लागतात – संजय राऊत
शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी यावेळी शिवबंधन कार्य अहवालाच्या मुखपृष्ठाची प्रशंसा केली. मनगटावर शिवबंधन, मूठ घट्ट वळलेली आहे आणि तो हात अंबादास दानवे यांचाच आहे. नाहीतर काहींना मनगटे भाडय़ाने घ्यावी लागतात आणि त्यावर ते शिवबंधन बांधून दाखवतात, असा टोला त्यांनी लगावला. पंतप्रधान मोदींनी पूर्ण कपडय़ांमध्ये गंगेत आंघोळ केली. चौकशी केली तेव्हा कळले की त्यांनी बुलेटप्रुफ जॅकेट घालून गंगेत कुंभस्नान केले. आज शिवसेनाप्रमुख असते तर त्यावर सुंदर व्यंगचित्र पहायला मिळाले असते, असे संजय राऊत म्हणाले. सध्या महाराष्ट्र व देशाचा कारभार म्हणजे व्यंगचित्रच आहे, अशी टीकाही त्यांनी केली. आम्ही पोलादाच्या भट्टीतून तावून सुलाखून निघालेलो आहोत. त्यामुळे मोदी आमचे काहीही वाकडे करू शकत नाहीत, असे सांगताना त्यांनी सूरज चव्हाण यांचेही उदाहरण दिले. मोदींनी संसदेत केलेले भाषण कसे खोटे होते हे संजय राऊत यांनी यावेळी सोदाहरण सांगितले. छत्रपतींचा महाराष्ट्र अशा खोटय़ांना कधीच माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.