राज्य सरकारला कोटय़वधींचा महसूल मिळवून देणाऱ्या महाराष्ट्र राज्य पेपर लॉटरीवरील बंदीचे संकट तूर्तास टळले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली, लॉटरी विक्रेता सेनेचे प्रमुख मार्गदर्शक सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेचे अध्यक्ष मनोज वारंग यांच्या पुढाकाराने आणि लॉटरी बचाव कृती समितीने गेल्या अनेक महिन्यांपासून राज्य सरकारकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून वित्त विभागाने महाराष्ट्र राज्य पेपर लॉटरीच्या छपाईचे आदेश लॉटरी विभागाला दिले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईसह राज्यातील दहा हजार लॉटरी विक्रेते आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या सुमारे सव्वा लाख कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.
पारदर्शी आणि विश्वासार्ह असलेली महाराष्ट्र राज्य पेपर लॉटरी बंद करण्याच्या हालचाली राज्यातील भाजप सरकारकडून सुरू होत्या. लॉटरी बंद झाली असती तर लाखो लॉटरी विक्रेता कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा आणि रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण होणार होता. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सुनील शिंदे, शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेचे अध्यक्ष मनोज वारंग आणि लॉटरी बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. या निवेदनात महाराष्ट्र राज्य पेपर लॉटरी बंद करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली. या निर्णयासाठी लॉटरी विक्रेत्यानी समाधान व्यक्त केले असून पाठपुरावा करणाऱ्या शिवसेना, शिवसेना लॉटरी विक्रेता सेना आणि लॉटरी बचाव कृती समितीचे आभार मानले आहेत.
अंध, अपंग, वृद्ध, बेरोजगारांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न
बैठकीत अंबादास दानवे यांनी लॉटरीची सद्यस्थिती व त्यावरील उपाययोजना याबाबत अजित पवार यांच्यासोबत सविस्तर चर्चा करत त्यांना माहिती दिली. आमदार सुनील शिंदे यांनी राज्यात अनेक अंध, अपंग, वृद्ध व बेरोजगार लॉटरी विक्रेते असून त्यावर लाखो मराठी कुटुंबाचा उदरनिर्वाह असल्याने ही लॉटरी बंद झाल्यास त्यांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे ही लॉटरी बंद न करण्याबाबत लक्ष वेधले होते. यावेळी राज्याच्या तिजोरीत दरमहा महसूल देणारा हा लॉटरी व्यवसाय बंद न करता तो अधिक नफ्यात कसा आणता येईल याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना अजित पवार यांनी लाटरी आयुक्त प्रेरणा देशभ्रतार आणि अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता यांना दिले.