![high court](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/08/high-court-696x447.jpg)
बदलापूर अत्याचार प्रकरणील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी त्याच्या वडिलांनी हे प्रकरण पुढे लढायचे नाही. त्यामुळे ते बंद करण्यात यावे, अशी मागणी हायकोर्टाकडे केली आहे. आज झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सुनावणीसाठी कोर्टात येण्याची आवश्यकता नाही असे सांगत या प्रकरणावरील सुनावणी 24 फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली.
अक्षय शिंदे याच्या बनावट एन्काऊंटरची एसआयटी चौकशीची मागणी करत त्याच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीवेळी हे प्रकरण आपल्याला पुढे लढायचे नाही. त्यामुळे ते बंद करण्यात यावे, अशी मागणी अक्षय शिंदे याच्या पालकांनी उच्च न्यायालयात केली. त्या वेळी न्यायालयाने पालकांच्या मागणीची दखल घेत तुमच्यावर कोणी दबाव आणला का, अशी विचारणा त्यांना केली. त्यावर आमच्यावर कोणाचाही दबाव नाही. आम्हाला ताण आणि धावपळ सहन होत नाही. शिवाय आमच्या सुनेला आताच बाळ झाले आहे, ती एकटी राहते. आम्हाला तिच्याकडे राहायला जायचे आहे असे अक्षय शिंदे याच्या पालकांनी न्यायालयाला सांगितले होते. आज शुक्रवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना सुनावणीला उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. तुमच्या अनुपस्थितीत सुनावणी घेऊ असे स्पष्ट करत याचिकेवरील सुनावणी तहकूब केली.