निवडणूक आयोगाला हाताशी धरून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपकडून मतदानात मोठ्या प्रमाणात हेराफेरी करण्यात आल्याचा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केला. यासंदर्भातील आकडेवारीच सादर करत महाराष्ट्रात लोकसभेनंतर अवघ्या पाच महिन्यांत 39 लाख मतदार कसे वाढले? हे वाढलेले मतदार कुठून आले? महाराष्ट्राच्या प्रौढ लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या अधिक कशी? कॉँग्रेसला लोकसभेत मिळाली तितकीच मते मिळाली, वाढलेली सगळी मते भाजपला कशी मिळाली, असे सवाल त्यांनी निवडणूक आयोगाला केले आहेत.
महाराष्ट्रात निवडणुकीआधी मतदार यादीत मोठ्या प्रमाणात हेराफेरी करण्यात आली. राज्यात लोकसभेपूर्वी 32 लाख मते आणि विधानसभेपूर्वी 39 लाख मते जोडली गेली. लोकसभेनंतर अवघ्या पाच महिन्यांत 7 लाख नवीन मतदार जोडले गेले आहेत. त्याचवेळी अनेक दलित, अल्पसंख्याक मतदारांची नावे मतदान यादीतून हटविण्यात आली. पारदर्शकपणे निवडणुका घेणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याची चौकशी करावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.
ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाविरुद्ध कोर्टात जाणार
महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी ज्या मतदारांची नावे मतदान यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. त्या वाढलेल्या मतदारांची पह्टो आणि पत्त्यासह यादी आम्हाला द्या. मी कोणतेही आरोप करत नाहीत, पण मतदार यादीत काहीतरी गडबड आहे. आम्ही वस्तुस्थिती मांडली आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात खुलासा करावा. त्यांनी माहिती दिली नाही तर ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाविरुद्ध कोर्टात जाऊ, असा इशारा राहुल गांधी यांनी यावेळी दिला.
निवडणूक आयुक्त नियुक्त करण्याच्या प्रक्रियेत बदल
निवडणूक आयोगाचे आयुक्त एका समितीकडून नेमले जात होते. त्यात सरन्यायाधीश, विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधान होते. लोकसभा निवडणुकीआधी त्यात सरकारकडून बदल करण्यात आला. सरन्यायाधीशांना त्यातून बाहेर काढण्यात आले आणि एका भाजपा व्यक्तीला त्या समितीत दाखल करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या आधी निवडणूक आयुक्तांना हटवण्यात आले आणि नव्या आयुक्तांना तिथे नेमण्यात आले, असे राहुल गांधी म्हणाले.
वाढलेली सगळी मते भाजपला
- महाराष्ट्रामध्ये विधानसभेला आमची मतदानाची संख्या कमी झालेली नाही. लोकसभा निवडणुकीत आम्हाला जेवढी मते मिळाली तेवढीच मते आम्हाला विधानसभा निवडणुकीतदेखील मिळाली आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत मतदारांची जी संख्या वाढली तेवढीच मतेही भाजपची विधानसभेत वाढली हे गंभीर असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
- काँग्रेसला लोकसभेत कामठी विधानसभा मतदारसंघात 1.36 लाख मते मिळाली. विधानसभेत आम्हाला तिथेच 1.34 लाख मते मिळाली. यात फारसा फरक पडलेला नाही. पण या काळात या मतदारसंघात 35 हजार नव्या मतदारांचा समावेश झाला आहे. दुसरीकडे भाजपला लोकसभेत 1.9 लाख मतं मिळाली होती. विधानसभेत त्यांना 1.75 लाख मतं मिळाली. यातले बहुतेक मतदान हे त्या नव्याने समाविष्ट झालेल्या मतदारांमधून झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. राज्यातील अनेक मतदारसंघांत असे प्रकार घडल्याचे दिसून येत असून, वाढलेली मते भाजप महायुतीलाच कशी मिळाली, असा सवाल राहुल गांधी यांनी केला.
- विधानसभा निवडणूक 2019 ते लोकसभा निवडणूक 2024 या पाच वर्षांत 32 लाख मतदारांचा याद्यांमध्ये नव्याने समावेश करण्यात आला. पण लोकसभा 2024 ते विधानसभा 2024 या पाच महिन्यांत 39 लाख नवे मतदार कसे समाविष्ट झाले?
- महाराष्ट्रात जेवढे मतदार वाढलेत एवढे मतदार अख्ख्या हिमाचल प्रदेशमध्ये आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर पाच महिन्यांत समाविष्ट झालेले मतदार आधीच्या पाच वर्षांतल्या मतदारांपेक्षा जास्त कसे? हे 39 लाख मतदार कोण आहेत?
- सरकारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राची प्रौढ लोकसंख्या 9.54 कोटी आहे; पण निवडणूक आयोगाच्या यादीनुसार महाराष्ट्रात त्याहून जास्त म्हणजे 9.70 कोटी मतदार आहेत. लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त कशी होऊ शकते?
ईव्हीएम हटवा – सुप्रिया सुळे
आमदार उत्तम जानकर यांना माळशिरस विधानसभा मतदारसंघात जेवढी मते मिळायला हवीत, तेवढी मते मिळाली नाहीत. मनसेच्या एका उमेदवाराला त्याचे स्वतःचेही मत मिळाले नसल्याकडे लक्ष वेधत निवडणूक पद्धतीत पारदर्शकता आणण्यासाठी ईव्हीएम हटवा आणि मतपत्रिकेवर निवडणुका घ्या, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. तुतारी व पिपाणी चिन्हामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसचा 11 मतदासंघांत पराभव झाल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या दारुण पराभवानंतर भाजपने महाराष्ट्रातील मतदार याद्यांत बोगस मतदार घुसवून कशाप्रकारे विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या याची पोलखोल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.
मतपत्रिकेवर निवडणुका घ्या – सुप्रिया सुळे
मारकडवाडीचा मुद्दा उपस्थित करत सुप्रिया सुळे यांनी ईव्हीएमवर घेण्यात येणाऱया मतदानाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आणि मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची मागणी केली. मनसेच्या एका उमेदवाराला स्वतःचेही मत मिळाले नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आयोग जिवंत असेल तर उत्तर देईल – संजय राऊत
निवडणूक आयोग खरोखरच जिवंत असेल तर त्यांनी राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या वेळी अचानक निर्माण झालेले बोगस 39 लाख मतदार हे फ्लोटिंग अर्थात फिरते मतदार आहेत, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले. हे मतदार कुठून आले हे माहीत नाही. पण आता ते बिहारला जातील. त्यानंतर उत्तर प्रदेशात जातील. त्यांची नावे, आधार कार्ड आदी सर्वकाही तेच राहतील. पण ते फिरत राहतील. त्यापैकी काही मतदार दिल्लीत आलेत. बोगस मतदार यादीत घुसडायचे आणि निवडणुका जिंकायच्या, असा पॅटर्न सध्या राबवला जात आहे, असे संजय राऊत म्हणाले.
39 लाख फ्लोटिंग मतदार – संजय राऊत
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या वेळी अचानक निर्माण झालेले बोगस 39 लाख मतदार हे फ्लोटिंग अर्थात फिरते मतदार आहेत. हे मतदार आता ते बिहारला जातील. त्यानंतर उत्तर प्रदेशात जातील, असे संजय राऊत म्हणाले.