![EKNATH SHINDE CM](https://www.saamana.com/wp-content/uploads/2023/02/EKNATH-SHINDE-CM-696x447.jpg)
विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये झालेला झोलझाल, शेवटच्या एका तासातील भरमसाट मतदान, लाखोंच्या संख्येने वाढलेले मतदार याबाबत गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा झडत असतानाच आज ठाण्यात एकनाथ शिंदे यांनीच महायुतीच्या विजयाचे भांडे फोडले. महाराष्ट्रात सरकार येणार नाही असा डाऊट होता. पण आम्ही गेम चेंज करून सरकार आणलं. हा गेम चेंज करण्यासाठी आम्हाला अनेक उलाढाली कराव्या लागल्या याची कबुलीच शिंदे यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजप व मिंध्यांना महाविकास आघाडीने जोर का झटका दिला. 48 पैकी 31 जागा इंडिया आघाडीला मिळाल्या. त्यानंतर फक्त सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आश्चर्यकारक निकाल लागले. ज्यांना जिंकण्याची खात्री होती ते निवडणूक हरले व हरण्याची खात्री होती ते उमेदवार हजारोंची आघाडी घेऊन विजयी झाले. हा ‘चमत्कार’ कसा झाला याबाबत अजूनही चर्चा सुरू असताना आज एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना जाहीर कबुलीच दिली.
योजनांचा वाचला पाढा
विधानसभा निवडणुकीत आपण निवडून कसे आलो हे सांगताना शिंदे म्हणाले, लोकसभेच्या वेळी आम्हाला कमी जागा मिळाल्या. त्यामुळे अनेकांना वाटले आता काय होणार. विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार येईल की नाही याबाबत काहींच्या मनात डाऊट होता. पण चार-पाच महिन्यांत आम्ही असा ‘गेम चेंज’ केला की पूर्ण ताकदीनिशी सरकार आणून दाखवले. हे सांगण्यापूर्वी शिंदे यांनी लाडकी बहीण योजना, कोस्टल रोड, नागपूर मेट्रो, अटल सेतू आदींचा पाढा वाचला.