![M.S.K. Pre-Primary School, Chunabhatti](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/M.S.K.-Pre-Primary-School-Chunabhatti-696x447.jpg)
पूर्वी बच्चे कंपनीच्या खेळात बाहुला-बाहुलीचे लग्न हा खेळ हमखास असायचा. आजच्या मोबाईलच्या युगात मात्र जुने पारंपरिक खेळ हरवत चालले आहेत. जुन्या पारंपरिक खेळांची ओळख आजच्या पिढीला व्हावी यासाठी चुनाभट्टी येथील एम. एस. के. पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विद्यालयात आज थाटामाटात बाहुला-बाहुलीचा लग्नसोहळा पार पडला.
गेल्या 12 ते 13 वर्षांपासून एम. एस. के. पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विद्यालयात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. बाहुला-बाहुलीच्या या अनोख्या लग्न सोहळय़ासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक असे तब्बल 200 हून अधिक वऱहाडी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. ठरलेल्या मुहूर्तावर लग्न लागावे यासाठी वधूपिता आणि वरपित्याची सुरू असलेली धावपळ, परिसरात बॅण्डबाजासह बाहुल्याची काढलेली वरात, नटूनथटून बाहुला-बाहुलीची मंडपात झालेली एंट्री, मंगलाष्टक म्हणत आंतरपाट धरत लागलेले लग्न, वऱहाडी मंडळींनी वधू-वरावर टाकलेल्या अक्षता त्यानंतर सर्वांसाठी पुरी, भाजी, श्रीखंडाची खास पंगत असे वातावरण पाहायला मिळाले. शाळेच्या अध्यक्षा प्रमिला गोस्वामी, सचिव प्रणिता भारती, मुख्याध्यापक मंगल सरमळकर यांचीही यावेळी उपस्थिती होती.