आपला देश कृषिप्रधान देश आहे असे आपण म्हणतो. पण आज आम्ही जेव्हा बांधावर जातो तेव्हा एवढं कळतं की आपला शेतकरी बांधव त्रस्त आहे. आपण सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचूया. त्यांच्या समस्यांचे मूळ शोधूया. मातीतून कृषिप्रधान देश काय असतो हे जगाला दाखवून देऊया, असा आशावाद शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
परळ येथील नरे पार्क येथे माणदेशी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘लखपती शेतकरी संवाद मेळाव्या’त आदित्य ठाकरे बोलत होते. आदित्य ठाकरे यांनी शेतकऱयांच्या कथा, व्यथा आणि यशोगाथा जाणून घेतल्या. ‘सरकार असतानाही आणि नसतानाही आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, शेतकऱयांच्या व्यथा जाणून घेतो. आमचे सरकार असताना टँकरने पाणी पुरवठा केला, चारा छावण्या उभारल्या, ‘विकेल ते पिकेल’सारख्या चांगल्या योजना आणल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरण बदलामध्ये शेतकऱ्यांची पिके कशी वाचवायची हा मोठा प्रश्न आहे. अशा वेळी समस्याच्या मुळापर्यंत पोचलं पाहिजे. कृषी विद्यापीठातूंन काही बदल करू शकतो का, शेतकऱयांपर्यंत पोहोचू शकतो का हे पाहणे काळाची गरज आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले यावेळी एचएसबीसीच्या सस्टेनबिलिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष रोमित सेन, यूएस ग्रेन्स कौन्सिलच्या दक्षिण आशियाचे प्रादेशिक संचालक रीस पॅनडी, माणदेशी फाऊंडेशनच्या संस्थापक चेतना सिन्हा, करण सिन्हा, एनआरसीपीचे राजीव मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.
माती कळली त्याला शेती कळली
माणदेशी फाऊंडेशनच्या मदतीने माती पाणी परीक्षण करून उत्पादन वाढवले. हे शेतकरी आज वर्षाला लाखो रुपये कमवत आहेत. थेट मलेशियामध्ये त्यांचे उत्पादन जात आहे, अशी माहिती मेळाव्याला उपस्थित दीपक बाबर, भानुदास बाबर, मयूरी बाबर, विलास बाबर, कांचन पवार, विजय पवार आदी अनेक शेतकऱयांनी दिली.
फोडाफोडी, पालकमंत्रीपद तर कधी बंगल्यावरून सरकारमध्ये भांडण सुरू आहे. ईव्हीएमने निवडून आलात, पण जनतेची काम तरी करा. शिवभोजन, आनंदाचा शिधा, लाडकी बहीण योजना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यावर बंद करतील. – आदित्य ठाकरे, शिवसेना नेते