विनायक वासुदेव चाळीतील रहिवाशांना शिवसेना न्याय मिळवून देणार

भायखळ्याच्या विनायक वासुदेव चाळीतील रहिवाशांनी आपल्या हक्कांसाठी आझाद मैदान येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. या रहिवाशांची आज शिवसेनेचे उपनेते, आमदार मनोज जामसुतकर यानी भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच शिवसेना सर्व रहिवाशांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीनिशी उभी राहील आणि त्यांना त्यांचे हक्क मिळवून देईल, अशी ग्वाही रहिवाशाना दिली.

विकासक दोस्ती रियाल्टी लिमिटेड आणि संचालक दीपक गोराडिया यांच्याविरोधात स्थानिकांनी हे आंदोलन पुकारले असून गेल्या 17 वर्षांपासून रहिवासी सातत्याने आपल्या हक्कांसाठी पाठपुरावा करत आहेत, परंतु विकासक त्यांना कुठल्याही प्रकारची दाद देत नसल्याचे रहिवाशांनी जामसुतकर यांना सांगितले. जामसुतकर यांनी रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांच्याशी संवाद साधला आणि मार्गदर्शन केले. तसेच या प्रकल्पाबाबत मुंबई महानगरपालिका, म्हाडा तसेच राज्य सरकारशी चर्चा करून मार्ग कसा काढता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही जामसुतकर यांनी रहिवाशांना दिले.