हम सब एक है…, शिवसेना खासदारांची एकीची वज्रमूठ

शिवसेनेच्या खासदारांच्या निष्ठेबद्दल जनमानसांमध्ये मने कलुषित करण्याचा भारतीय जनता पक्ष आणि मिंधे गटाचा प्रयत्न सुरू आहे त्याचा आम्ही निषेध करतो, असे सांगत शिवसेनेच्या सर्व खासदारांनी आमची वज्रमूठ मजबूत आहे, ‘टायगर जिंदा है, हम सब एक है’ अशी ग्वाही प्रसारमाध्यमांसमोर दिली.

शिवसेनेचे खासदार फुटणार असा दावा मिंधे गटाकडून करण्यात आला. त्यासाठी ऑपरेशन टायगर राबवण्यात येत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांवर झळकले. खासदारांच्या फोटोंसह त्या बातम्या टीव्ही वाहिन्यांनी दाखवल्या. त्या पाहताच शिवसेनेचे खासदार संतापले. मिंधे आणि भाजपच्या या कारस्थानाला छेद देण्यासाठी शिवसेनेच्या सर्व खासदारांनी एकत्रपणे माध्यमांसमोर येऊन जाहीर पत्रकार परिषद घेतली.

मिंधे गटाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्यात सुसंवाद नाही. विसंवाद सुरू आहे. बहुमताने सरकारमध्ये येऊनही रोज त्यांच्याबद्दल नवनवीन बातम्या येत आहेत. अनेक मंत्री गटांगळय़ा खात आहेत. त्याकडून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठीच शिवसेनेचे खासदार फुटणार अशा पुडय़ा सोडल्या जात आहेत, असे यावेळी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत म्हणाले. लोकसभेत गुरुवारी शिवसेनेच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले तेव्हाही शिवसेनेचे सर्व खासदार उपस्थित होते, असेही ते म्हणाले.

आमच्यापैकी कुणालाही, कुणाचाही फोन आलेला नाही. आम्ही सर्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत होतो, आहोत आणि राहू याबद्दल वाद नाही. काहीही चढउतार होऊ द्या आम्ही सर्व शिवसेनेसोबतच आहोत, असे शिवसेना खासदारांनी ठामपणे सांगितले. टीव्ही वाहिन्यांनी शिवसेना खासदारांच्या फोटोसह बातम्या दाखवल्याने त्यांच्या मतदारसंघांमध्ये चर्चा सुरू झाली. त्याबद्दल यावेळी खासदारांनी नाराजी व्यक्त केली.

चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्या निवडणुकीवेळी जो जाहीरनामा दिला त्यात मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण द्या अशी त्यांची मागणी होती. वक्फ बोर्डामध्ये सुधारणा आल्या तेव्हा त्याबद्दल नायडू सहमत नाही. त्यामुळे केंद्र सरकारमध्येही गोंधळ सुरू आहे. त्यामुळे चंद्राबाबू सोडून गेले तर काय करायचे. त्यासाठी अशा पुडय़ा सोडल्या जाताहेत. नितीश कुमारही खूश नाहीत, असेही सावंत म्हणाले.

मिंधे गटातला एक माणूस काही आमदारांना घेऊन जातोय असे शिवसेना नेते-खासदार संजय राऊत काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. त्यामुळे शिवसेनेविरुद्ध बातम्या पेरल्या जात आहेत. महागाई, अत्याचार, बेरोजगारीसारखे ज्वलंत विषय थांबवण्यासाठीच अशा बातम्या पेरल्या जात आहेत. आता पुन्हा बदलापूर येथे बलात्काराची घटना घडली. महायुती सरकार आताही धड चालत नाही. पालकमंत्र्यांमध्ये वाद सुरू आहेत. हे सर्व विषय थांबण्यासाठीच अफवा पसरवल्या जात आहेत. शिवसेना सोडून जे गेलेत ते ईडीच्या भीतीपोटी गेले, प्रलोभनासाठी गेले. निष्ठेवर आणि विचारावर गेले नाहीत. आमची निष्ठा शिवसेनेवरून कदापि ढळणार नाही, असे खासदार सावंत म्हणाले.

अकराच्या अकरा खासदार शिवसेनेत

शिवसेनेत उद्धव ठाकरे, शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि संजय राऊत असे फक्त तिघेच उरतील अशी टीका भाजप आणि मिंध्यांकडून केली जाते. त्याबद्दल माध्यमांनी विचारले असता शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई म्हणाले की, त्यांनी त्यांचा विचार करावा. त्यांच्याच पक्षात काय होतेय हे महाराष्ट्राची जनता पाहतेय. कुणाला कुठेही फेकले जातेय. आम्ही अकराच्या अकरा खासदार शिवसेनेसोबतच आहोत, असे अनिल देसाई म्हणाले.