लक्ष्यवेधी – देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी

काय सांगता! मानेवर काढला कंपनीचा टॅटू

कॅनडात राहणाऱ्या एका हिंदुस्थानी व्यक्तीने कंपनीच्या लोगोचा टॅटू आपल्या मानेवर काढला. रामिंदर ग्रेवाल असे या तरुणाचे नाव असून तो 2007 पासून या कंपनीत काम करतोय. एकाच कंपनीत प्रोजेक्टर मॅनेजरपासून पार्टनर आणि अध्यक्ष होण्यापर्यंतचा प्रवास झाल्याने रामिंदरने आनंदाच्या भरात आपल्या मानेवर कंपनीचा लोगो काढून कंपनीबद्दल आपले किती प्रेम आहे हे दाखवून दिलेय. मानेवर टॅटूचा पह्टो रामिंदरने लिंक्डइनवर शेअर केलाय. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

ऑटोत फिश टँक, स्पीकर, डिस्को लाईट

पुण्याचा ऑटो ड्रायव्हर चांगलाच व्हायरल होतोय. त्याने असा काही कारनामा केलाय की त्याचा ऑटो म्हणजे चालताफिरता एंटरटेनमेंट झोन आहे. त्यात मत्स्यालय, स्पीकर आणि रंगीबेरंगी डिस्को लाईट्स लावलेल्या आहेत. अशा हटके ऑटोचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओत असं दिसतंय की, ऑटो ड्रायव्हरच्या सीटच्या मागे फिश टँक आहे. रिक्षा सुरू असताना पाणी हलणार नाही अशा पद्धतीने फिश टँकला फिट करण्यात आले आहे.

ओलाची इलेक्ट्रिक बाईक लाँच, 501 किमीची रेंज

ओला इलेक्ट्रिकने आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक रोडस्टर एक्स लाँच केली आहे. या बाईकला तीन वेगवेगळ्या बॅटरी पॅकमध्ये आणि दोन व्हेरियंट्स लाँच केलेय. या बाईकची सुरुवातीची किंमत 75 हजार असून या बाईकला 501 किलोमीटरची रेंज आहे, असे कंपनीने म्हटले आहे. रोडस्टर एक्ससाठी 74,999, रोडस्टर एक्स प्लससाठी 1,04,999  किंमत ठरवण्यात आली आहे.

महिंद्रा इलेक्ट्रिक ओरिजिनची  14 फेब्रुवारीपासून बुकिंग

महिंद्रा इलेक्ट्रिक ओरिजिनच्या सर्व 9 व्हेरियंट्सची बुकिंग येत्या 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजेपासून सुरू होणार आहे. एक्सईव्ही-9ई आणि बीई-6 यांची संपूर्ण श्रेणी नोंदणीसाठी उपलब्ध राहणार असून ग्राहकांना निवडीची संधी मिळणार आहे. प्रत्येक व्हेरियंटसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वाहनांची एक्स-शोरूम किंमत व वितरण वेळापत्रक कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर दिले आहे.

मार्चमध्ये येतोय  स्वस्तात मस्त आयफोन 

अॅपलने मार्च महिन्यात नवीन आयफोन लाँच करण्याची तयारी केली. आयफोन एसई 4 असे या फोनचे नाव असून हा फोन स्वस्तात मस्त आयफोन असणार आहे. ज्यांना कमी किंमतीत आयफोन वापरण्याची हौस आहे. त्यांच्यासाठी हा फोन असेल. या फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा, कटिंग एच ए 18 चिपसेट, 6.1 इंचाचा डिस्प्ले, स्लीक डिझाईन आणि स्लीम बेजल्स असू शकतात.

2027 मध्ये होणारचांद्रयान-4’ लाँच

2027 मध्ये हिंदुस्थानची ‘चांद्रयान-4’ मोहीम लाँच होणार आहे. मोहिमेद्वारे चंद्रावरील खडकांचे नमुने पृथ्वीवर परत आणले जातील. चांद्रयान-4 मध्ये जड-लिफ्ट एलव्हीएम-3 रॉकेटचे  दोन वेळा वेगवेगळे प्रक्षेपण केले जाईल. ‘चांद्रयान-4’ मोहिमेचे उद्दिष्ट चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने गोळा करणे आणि ते पृथ्वीवर परत आणणे. हिंदुस्थान 2026 मध्ये समुद्रयान मोहीमदेखील लाँच करणार आहे.