![river](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/river-696x447.jpg)
>> स्पायडरमॅन
सोशल मीडियावर सध्या सर्वात जास्त चर्चिला जात असलेला विषय म्हणजे कुंभमेळा होय. कुंभमेळ्याच्या निमित्ताने हिंदुस्थानी सभ्यता, चालीरीती, परंपरा यांच्या जोडीने गंगा नदीदेखील चर्चेत आली आहे. गंगेचे महात्म्य, तिचे पुराणातील स्थान, तिचे शुद्ध पाणी याविषयी अनेक जण माहिती देत असताना, एका बाजूला गंगेसारख्या शांत नद्या जगात आहेत तिथेच काही धोकादायक नद्यादेखील आहेत अशी एक चर्चा सुरू झाली आहे. अनेक जण अशा धोकादायक नद्यांविषयीची माहिती देत आहेत.
पाणी हे मानवासाठी अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे प्राचीन काळात अनेक नागरी सभ्यतांचा उगम हा नदीकिनारी झाल्याचे दिसून येते. मात्र शांतपणे वाहणाऱ्या, मानवी जीवनास अनुकूल अशा नद्यांच्या सोबत काही मानवासाठी धोकादायक अशा नद्यादेखील जगात आहेत. कांगो नदी ही आफ्रिकेतील दुसऱ्या क्रमांकाची मोठी नदी आहे. या नदीला जगातील सर्वात खोल नदी म्हणूनदेखील ओळखले जाते. या धोकादायक नदीमध्ये मगरी आणि हिप्पोपोटॅमस मोठय़ा संख्येने आढळतात. मिसिसिपी ही उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठी नदी मानली जाते. मानवी जीवनासाठी धोकादायक असलेल्या अनेक प्राण्यांचा या नदीत रहिवास आहे. सर्वात गंभीर म्हणजे या नदीचे पाणी अत्यंत प्रदूषित आहे. जे मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे.
भारत, चीन आणि बांगलादेशमधून वाहणारी ब्रह्मपुत्रा नदीदेखील तिच्या पाण्याच्या प्रचंड वेगामुळे धोकादायक मानली जाते. ही नदी अनेकदा पुराचा धोका निर्माण करते आणि मानवी जीवनाबरोबरच संपत्तीचीदेखील हानी करते. नील नदी ही आफ्रिकेतील सर्वात मोठी नदी आहे. या नदीमध्ये मगरी आणि विषारी साप यांची संख्या लक्षणीय आहे. याचबरोबर या नदीमध्ये अनेक प्रकारचे धोकादायक सूक्ष्मजीवदेखील आढळून येतात. शनय टिम्पिश्का या नदीला अॅमेझॉनची उकळती नदी म्हणून ओळखले जाते. भूमिगत ज्वालामुखींमध्ये होत असलेल्या हालचालींमुळे या नदीचे पाणी असे गरम आहे असे संशोधक सांगतात.