सरकारी यंत्रणा आणि पैशांशिवाय एकतरी शिवसैनिक फोडून दाखवा, उद्धव ठाकरे यांचे आव्हान

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या ‘शिवबंधन’ कार्यअहवालाचे प्रकाशन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र धर्मसाठी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी हातात शिवबंधन आणि भगवा घेत उतरावे लागेल, असा निर्धार व्यक्त केला. आपण राष्ट्रहितासाठी लढाईला तयार आहोत, लोकशाहीची हत्या करणाऱ्यांना आपल्याला धडा शिकवावाच लागेल, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

आपल्याला इथे बघून समाधान वाटते की अनेकांनी फोडाफोडी करून आपल्या अस्सल शिवसैनिकांच्या तटबंदीला चरासुद्ध पडलेला नाही. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मार्गदर्शन करताना पंतप्रधानांच्या गंगास्नानाचा उल्लेख केला. त्यांनी बुलेटप्रुफ जॅकेट घालून गंगास्नान केले. गंगेत डुबकी मारताना आपला रुपयाही बुडतोय याकडेही त्यांनी लक्ष द्यावे,असा जबरदस्त टोलाही उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना लगावला.

ज्याच्या हातात शिवबंधन आहे, तो शिवसैनिक कोठेही इकडे तिकडे जाऊ शकत नाही. लढण्यासाठी तलवार लागते, तलवार पेलण्यासाठी मनगट लागते. मनगाटासह कणखर मनही लागते. नाहीतर हातात तलवार आहे, मात्र, चालवण्याची हिंमत होत नाही. ती कोठे चालवायची हेच त्यांना कळत नाही. ज्यांनी गद्दारी केली, त्यांची मने मेली आहे. त्यांना तलावर कोठे चालवतो, याचे भान नाही. सूरजला आपण काय दिले. पण तो कट्टर शिवसैनिक आहे. तो झुकला नाही. दिल्लीचेही तख्त राखतो, महाराष्ट्र माझा हे दिल्लीवाल्यांना माहित नाही. महाराष्ट्रावर अन्याय केला, तर दिल्लीचेही तख्त फोडतो, महाराष्ट्र माझा, हे आपल्याला दिल्लीला दाखवून द्यावे लागेल. आपले कट्टर शिवसैनिक अंबादास दानवे म्हणाले आज ते भाषण करणार नाही. आपले कामच बोलते. आपण फिल्म बनवली आहे. माझे काम झाले आहे, अशी त्यांची निष्ठा आहे,असेही ते म्हणाले.

एका काळात अन्यायाविरोधात, महाराष्ट्रासाठी लढण्यासाठी अनेकजण शिवसैनिक झाले. अनेकांनी स्वाभिमानासाठी अंधारात उडी घेतली. मात्र, आता अंधार फारकाळ टिकणार नाही. आता आपल्या हातात मशाल आहे. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत भाजपचा बहुमताचा बुरखा फाडला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदापासून पालकमंत्रीपदापर्यंत त्यांच्यात रस्सीखेच सुरू असलेली आपण पाहिली. त्यांना विजयही पचलेला नाही. प्रत्येकजण आपापला वाटा ठरवत आहे. काहीजण या खेचाखेचीलाच बाळासाहेबांचे विचार म्हणतात. लाचार सेनेचे प्रमुख नेते त्यांना डोकं नसल्याने ते दाढी खाजवतात. त्यांच्याकडे बघून कोणाला प्रेरणा मिळत असेल तर त्यांनी खुशाल जावे. रुसुबाई रुसू गावात जाऊन बसू, डोळ्यातले आसू आता लागले दिसू, अशी त्यांची अवस्था झाली आहे, अशी टोलाही त्यांनी लगावला.

शिवसेनेचे सहा सात खासदार फुटणार, अशी बातमी त्यांनी सोडून दिली होती. हिंमत असेल तर फोडून दाखवाच, हे आपले आव्हान आहे. आता शिवसैनिकांच्या संयमाचा अंत पाहून नका, फोडाफोडी करायला गेलात तर तुमची डोकी कधी फुटतील याचा नेम नाही. आपले आव्हान आहे की, फोडाफोडी करायची असेल तर सर्व तपास यंत्रणा बाजूला ठेवा, सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा आणि मर्दाची अवलाद असाल तर एकतरी शिवसैनिक फोडून दाखवा,आपण तुमचे नेतृत्व स्वीकारतो. पैशांची आमिषे, ईडी, सीबीआय, अटकेची भीती दाखवायची असे करणारे हे नामर्दाची अवलाद आहेत. नकली बापाची अवलाद आहेत ते, कसलीच हिंमत नाही. त्यांनी आज देश नासवला आहे. देशाच्या मुळावर कोण येत असेल तर देशहितासाठी आम्ही उभे आहोतच, आमच्यासोबत येतील, त्यांचेही स्वागत आहे. आम्ही आधी देशद्रोह्यांना गाडू, सत्तेच्या साठमारीत लोकशाहीचा खून करणाऱ्यांपासून आम्ही देशाला वाचवणार आहोत,असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

आता आपला महाराष्ट्रच देशाला वाचवत आहे. 1992 च्या जातीय दंगलीत मुंबई कोणी वाचवली होती, हे देशाला माहिती आहे. आम्ही हिंदुत्व सोडले असा अपप्रचार होत आहे. आम्ही हिंदुत्व कसे सोडले ते त्यांनी दाखवून द्यावे. राहुल गांधींनी महाराष्ट्रातील मतादानाचा महाघोटाळा उघड केला आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्याला विनोद म्हटले. लोकशाहीची हत्या हा त्यांना विनोद वाटतो., असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

राज्य सरकार बांगलादेशींना रेसनकार्ड देते, त्यामुळे तो नागरिकत्वाचा पुरावा होतो, असे त्याकाळाचे निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांनी सांगितले होते. आता आधारकार्ड हे ओळखपत्र झाले आहे. बोगस आधारकार्ड देत निवडणुकीत बोगस मतदान झाले आहे, असा आरोपही त्यांनी केला. कमी मते मिळालेले मतदारसंघ निवडून त्यांनी तेथे बोगस मतदार घुसवले आणि मतदान केले. त्यांचा विजय हा खोटा आहे. त्यांनी लोकशाहीची हत्या करत विजय मिळवला आहे. आम्ही राष्ट्रप्रेमी आहोतच. आता देशासाठी, लोकशाहीसाठी लढण्याची वेळ आली आहे. लोकशाहीची गळा घोटणाऱ्यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे. त्यांनी खोटा विजय मिळवत सत्ता मिळवली. मात्र, जनतेचे प्रश्न कायम आहेत. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे आणि जनतेच्या मागे ठामपणे उभे राहण्याचे काम विरोधी पक्षनेत्याचे असते. ते काम अंबादास दानवे आणि शिवसैनिक करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

आता लाडक्या बहीणीच्या यादीतून 5 लाख महिलांना वगळण्यात येणार आहे. ही लाडक्या बहीणींची फसवणूक आहे. या बहिणींची मते घेतली आणि आता त्यांची नावे वगळण्यात येत आहेत. आता बहिणींना त्यांच्या जॅकेटवाल्या तीन भावांना जाब विचारायला हवा. बहिणींची त्यांनी फसवणूक केली आहे. या गोष्टींना आपण वाचा फोडली पाहिजे. जनतेच्या मनात शिवसेना आहेत आणि ती आपलीच शिवसेना आहे. काहीजण खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ झाले आहेत. त्यांचा गद्दरीचा शिक्का पुसला जाणार नाही. त्यांची गद्दार, तोतये म्हणूनच नोंद होणार आहे. खंडोजी खोपडे होणे सोपे आहे. मात्र, बाजीप्रभू, तानाजी होणे कठीण असते. यावेळी त्यांनी कोन्होजी जेधे यांच्या शौर्याची आणि निष्ठेची गोष्ट सांगितली. या निष्ठेलाच शिवबंदन म्हणतात.

आपल्या मुंबईची त्यांनी लूट केली आहे. मुंबईला भिकेचे डोहाळे त्यांनी लावले आहे. देशात सर्वाधिक करसंकलन करणारे शहर आपली मुंबई करते. मुंबई 35 ते 37 टक्के कर देते. महापालिका सलग काही वर्षे शिवसेनेच्या ताब्यात होती, तेव्हा 92 हजार कोटींच्या मुदत ठेवी आपण केल्या होत्या. कोस्टल रोडची उभआरणी आपल्या मुंबई पालिकेच्या ठेवीतून झाली आहे. त्या 92 हजार कोटींच्या ठेवी त्यांनी 80 हजार कोटींपर्यंत त्यांनी खाली आणल्या आहेत. त्यातून ते आणखी लूट करत आहे. त्यांनी अडीच लाख कोटींची देणी केली आहे. सुमारे 23 वर्षे महापालिकेची देणी फेडण्यातच जातील. बँक मे पैसा रखवर विकास नही होता. मग कंत्राटदारांवर खैरात केल्याने विकास होणार काय, मुंबई अदानीच्या घशात घातल्याने विकास होणार आहे काय, मुंबई गिळण्यासाठीच त्यांना शिवसेना नको आहे. मराठी माणसांचा कमजोर करण्यासाठी त्यांना शिवसेना फोडायची आहे. उद्या महापालिकेला उत्पन्न नाही म्हणून ते मुंबई महापालिका अदानीच्या घशात घालतील. ते रोखण्यासाठी मराठी माणसांची एकजूट होणे गरजेचे आहे. आता महाराष्ट्रधर्म आपल्याला देशाला दाखवायचा आहे. नोकऱ्या मागणारे होऊ नका, नोकऱ्या देणारे व्हा, असे आपल्याला आता राजकारणात घडवायचे आहे.

गद्दारांची स्तिती काजव्यासारखी झाली आहे. दिल्लीतून टॉर्च सुरू आहे. तोपर्यंत हे काजवे चमकत आहेत. दिल्लीतील टॉर्च बंद झाल्यावर काळोखात गद्दारांची चेंगराचेंगरी होणार आहे. रुरसूबाई रुसू, गावात बसू, आता जनता पेटली तर त्यांच्या घरात घुसू असे होईल. या भ्रष्ट कारभाराला उत्तर देण्यासाठी हातात शिवबंधन आणि आणि भगवा घेत आपल्याला उतरावे लागेल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.