![drugs](https://www.saamana.com/wp-content/uploads/2021/10/drugs-696x447.png)
नवी मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मोठी कारवाई केली असून एका मोठ्या ड्रग्च्याज टोळीचा पर्दाफाश केला आहे.31 जानेवारीला एनसीबीने नवी मुंबईत छापा टाकून 200 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी 4 जणांना अटक केली आहे. आरोपींकडून विविध प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.
विदेशातील काही लोक हे सिंडिकेट चालवत होते. जप्त करण्यात आलेले ड्रग्ज कुरिअर, लहान मालवाहू सेवा आणि मानवी वाहकांद्वारे आणले जात होते, अशी माहिती एनसीबीच्या मुंबई झोनल युनिटच्या एका अधिकाऱ्याने दिली. गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आलेल्या एका पार्सलमधून 200 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले होते. आणि त्यानंतर नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा लपवून ठेवण्यात आल्याची माहिती मुंबई एनसीबीला मिळाली. त्यानंतर केलेल्या कारवाईत या सिंडीकेटचा पर्दाफाश केला आहे.
एनसीबीने गेल्या आठवड्यात 31 जानेवारी रोजी नवी मुंबईतून 11.54 किलो अत्यंत उच्च दर्जाचे कोकेन, 4.9 किलो हायब्रीड स्ट्रेन हाइड्रोपोनिक आणि 200 पॅकेट (5.5 किलो) गांजा गमी जप्त केले. ज्याची किंमत सुमारे 200 कोटी रुपये आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे. या ड्रग्ज रॅकेट प्रकरणी देश व विदेशातील व्यक्तींचा तपास मुंबई एनसीबीकडून केला जात आहे.