RBI रेपो रेट कपातीच्या निर्णयानंतर बँकिंग शेअर्स घसरले; शेअर बाजाराची घसरण सुरुच

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजार दबावाखाली आहे. त्यामुळे बाजाराचे लक्ष आरबीआयकडून होणाऱ्या रेपोरोटच्या घोषणेकडे होते. मात्र, या घोषणेनेही बाजाराची निराशा झाली. RBI च्या रेपो रेटबाबतच्या घोषणेनंतर बाजारातील दबाव आणखी वाढला आणि बँकिंग स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. बाजाराला 0.50 पॉइंटची रेपो रेटमध्ये कपातीची अपेक्षा होती. मात्र, 025 ने रेपो दरात कपात करण्यात आली. त्याचा बाजारावर परिणाम झाला, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केली आहे. रेपो दरात 0.25 टक्के कपात करण्यात आली आहे. रेपो दरात कपात करण्याच्या घोषणेमुळे शेअर बाजारातील दबाव वाढल्याने निफ्टी 50 निर्देशांक 23500 अंकांच्या खाली घसरला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सही 77,730.37 अंकांपरंयत घसरला. बँकिंग शेअर्स घसरल्यामुळे बाजारात मोठी घसरण दिसत आहे.

बीएसईच्या सुरुवातीला टॉप 30 स्टॉकपैकी 18 स्टॉकमध्ये घसरण झाली होती. तर 12 स्टॉकमध्ये किंचित वाढ झाली होती. पॉवर ग्रिड, एसबीआय, आयटीसी आणि टीसीएस या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तसेच निफ्टीच्या 50 पैकी 23 स्टॉक तेजीत होते, तर 27 स्टॉकमध्ये घसरण झाली आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.25 बेसिस पॉइंट्सची कपात केल्यानंतर, निफ्टी बँक 171 अंकांनी घसरून 50,200 वर व्यवहार करत आहे. एसबीआय, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स 1.50 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. दुपारी 3 वाजेपर्यंत निफ्टी बँकेचा निर्देशांक 49,991.80 पर्यंत खाली आला होता. त्यात 390.30 अंकांची म्हणजेच 0.77 टक्क्यांची घसरण झाली आहे.

बँकिंग आणि वित्तीय सेवांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली तर रिअल इस्टेट आणि ऑटो शेअर्समध्ये वाढ दिसून आली. रिझर्व्ह बँकेने रेपो दर 0.25 बेसिस पॉइंट्सने कमी करण्याच्या घोषणेनंतर घर खरेदीदारांना निश्चितच फायदा होईल,असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. मात्र, RBI च्या घोषणेला बाजाराने नकारात्मक प्रतिसाद दिल्याने बाजारावरील दबाव आणखी वाढला आहे.