बँकिंग फसवणुकीपासून होणार सुटका, RBI चा मोठा निर्णय

देशात गेल्या काही वर्षांपासून बँक घोटाळ्याच्या तसेच डिजिटल पेमेंटमध्ये फसवणुकीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या फसवणुकींच्या घटनांना आळा घालण्यासाठी रिझर्व बैंक ऑफ इंडियाने एक मोठे पाऊल उचलले आहे. बँकिंग फसवणूक रोखण्यासाठी आरबीआयने एक उत्तम योजना आखली आहे. हिंदुस्थानी बँकांसाठी ‘bank.in’ आणि बिगर-बँक वित्तीय संस्थांसाठी ‘fin.in’ हे विषेश डोमेन तयार केले आहे. ‘bank.in’ साठी नोंदणी एप्रिल 2025 पासून सुरू केली जाईल. त्यानंतर ‘fin.in’ देखील लागू केले जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी याबाबात माहिती दिली आहे. आरबीआयच्या या योजनेमुळे सायबर सुरक्षा सुधारण्यास आणि फसवणूक कमी करण्यास मदत होईल. यामुळे डिजिटल बँकिंग आणि पेमेंट सेवांवरील नागरिकांचा विश्वास बसेल. तसेच यासाठी इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन बँकिंग टेक्नॉलॉजी (IDRBT) ची विशेष रजिस्ट्रार म्हणून नियुक्ती केली जाईल. याशिवाय, आरबीआयने क्रॉस-बॉर्डर ‘कार्ड नॉट प्रेझेंट’ (सीएनपी) व्यवहारांसाठी देखील निर्णय घेतला आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

दरम्यान, ही योजना सध्या देशांतर्गत व्यवहारांसाठी वापरण्यात येणार आहे. यासंदर्भात अधिक चर्चा करून लवकरच आंतरराष्ट्रीय ऑनलाइन व्यवहारांमध्येही लागू केली जाईल, असे ते म्हणाले. आरबीआयकडून लवकरच या संदर्भात एक परिपत्रक जारी केले जाणार आहे.